आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात शिक्षकांवर निवृत्तीनंतर उपोषणाची वेळ:विविध मागण्यांसाठी पेन्शनर टीचर्स फोरमतर्फे साखळी उपोषण

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांवर निवृत्तीनंतर हक्कांसाठी उपाेषणाची वेळ आली आहे. प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन-शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पेन्शनर टीचर्स फोरमतर्फे साेमवारी उपाेषण सुरू करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी व मागण्यांसाठी वर्षभर लेखी विनंती केल्यानंतरही प्रशासनाने तोंडाला पाने पुसली आहेत, असा आराेप फाेरमने केला आहे.

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या योग्य प्रकारे मार्गी लावून त्या सोडवण्यासाठी नव्यानेच स्थापन झालेल्या पेन्शनर टीचर्स फोरम या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने यापूर्वी प्रशासनाला अनेकदा निवेदन दिले. त्यानंतर थेट शिक्षण संचालकांकडे धाव घेतली हाेती. मात्र तरीही प्रश्न सुटले नसल्याने उपाेषण करण्यात आले. आता आमचे हे वय साखळी उपोषण, आंदोलन करण्याचे नाही. मात्र प्रशासनाने आम्हाला आंदोलन करण्यासासाठी भाग पाडले आहे. आमच्यातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे प्रशासनाने आमच्या समस्यांकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, अशी मागणी फाेरमने केली आहे. उपाेषणात जिल्हाध्यक्ष जयंत हरिभाऊ घाटोळ , रामभाऊ मालोकार, दिगंबर अटकर, अशोक राऊत, कल्पना बिडवे, सहभागी झाले.

या आहेत मागण्या

 • हेतू पुरस्करपणे थकवलेले काही शिक्षकांचे काही महिन्यांचे शेवटचे वेतन (सेवेत असतानाचे) त्वरित अदा करण्यात यावे.
 • पदोन्नतीनंतर मिळणारी जादा वेतन वाढ देण्यात यावी.
 • आदर्श शिक्षकांना मिळणारी जादा वेतनवाढ द्यावी.
 • एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या शिक्षकांच्या वेतनातून, निवृत्ती लाभातून केलेली कपात परत करावी.
 • अंश राशीकरण ( पेन्शन विक्री) रक्कम देण्यात यावी.
 • उपदान (ग्रॅच्युईटी) त्वरित मिळावे.
 • भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा.
 • गट विमा त्वरित मिळावा
 • वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी उपाेषण करण्यात येणार आहे.
 • गृहवासी प्रवास भत्ता देण्यात यावा.
 • सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा.
 • पात्र शिक्षकांना निवड श्रेणी लागू करण्यात यावी.
 • महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यात यावी.
 • घर भाडे भत्ता थकबाकी देण्यात यावी.

या आहेत समस्या

निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांवर निवृत्त शिक्षकांचे नियोजन अवलंबून असते. सेवानिवृत्तीनंतरचे पैसे न मिळाल्यामुळे काेणाचे मुलाचे लग्न लांबले , तर काेणाच्या कुटुंबातील सदस्यांची शस्त्रक्रिया रखडली. एका निवृत्त शिक्षकाने शेतीचा ईसार केला. मात्र ईसार बुडाला. निवृत्तीनंतर पैसे मिमळतील, या आशेने अनेकांनी व्यवहार करून ठेवले. मात्र या रकमांना विलंब लागत हाेत असल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...