आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोट्यावधी रुपये खर्चून उभ्या झालेल्या अकोल्यातील बहुप्रतिक्षीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ओपीडीला सोमवारी, 1 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. दरम्यान मनुष्यबळ उपलब्ध नसताना बाह्य रुग्ण विभाग सुरू होणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे सुपर स्पेशालिटीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय घाईचा ठरला अशी प्रतिक्रिया आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजपचे आमदार आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, माधव मानकर, अर्चना मसने, शंकरराव वाकोडे, किशोर पाटील, वसंत बाचुका यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचे माजी महापौर अर्चना मसने यांनी स्वागत केले. यावेळी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच भरती तसेच हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात तारीख घेऊ अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
ओपीडीची वेळ सकाळी 9 ते दुपारी 1
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 अशी राहणार आहे. सर्वोपचार रुग्णालयातून संदर्भित केलेल्या रुग्णांवर येथे उपचार होणार आहे.
चार विभाग कार्यान्वित
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील उपचार सुविधेत हृदयरोगशास्त्र विभाग, मेंदू विकार (न्युरो) सर्जरी विभाग, बर्न व प्लास्टिक सर्जरी विभाग व किडनीरोग विभाग हे चार विभाग कार्यान्वित झाले आहेत. प्रत्येक विभागासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टर रुजू झाले आहेत. ते ओपीडी सांभाळणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.