आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे:जनता भाजी बाजाराची जागा कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्याची व्यापाऱ्यांची मागणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता भाजी बाजाराची जागा व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी भाडेपट्ट्याने देण्यात यावी, या मागणीसाठी आज बाजार बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील टॉवर चौकातील जुने बसस्थानक आणि जनता भाजी बाजाराची जागा महापालिकेने महसूल विभागाकडून ताब्यात घेतली आहे. यासाठी रितसर २६ कोटी रुपयाचा भरणा महसूल विभागाकडे भरला आहे.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी या ठिकाणी भाजी बाजारासह व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. या हेतुने महापालिकेने येथील व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या. या प्रकरणात जनता भाजी बाजार संघर्ष समितीने तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे दाद मागितली. या प्रकरणात तत्कालीन महसूलमंत्र्यांनी जागेवर स्थगिती दिली. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला. या जागेवरील स्थगिती उठवण्याची मागणी माजी महापौरांसह भाजपच्या आमदारांनी केली. या प्रकरणात विद्यमान महसूलमंत्री विखे पाटील यांच्या दालनात सुनावणी झाली. तूर्तास जागेवरील स्थगिती उठवली नसली, तरी स्थगिती उठवण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने संघर्ष समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपाच्या रेकॉर्डनुसार ७६८ व्यावसायिक येथे कार्यरत आहेत. त्याच बरोबर अन्य ३५० असे एकूण १ हजार व्यावसायिक व्यवसाय करतात. मात्र, आमच्याशी चर्चा न करता, कोणतीही माहिती न देता, महापालिकेने ही जागा ताब्यात घेतली. त्यामुळे एक हजार कुटुंबाचा चरितार्थ कसा चालेल? हे व्यावसायिक रस्त्यावर येतील. त्यामुळेच ही जागा आम्हाला कायमस्वरूपी भाडेपट्ट्यावर द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जनता भाजी बाजारातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सज्जाद हुसैन, प्रदीप वखारिया, पंकज मनियार, विजय तिवारी, तश्वर पटेल, पंकज शिवाल, नीलेश चिराणीया, जितेंद्र अग्रवाल आदींसह शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...