आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंधन दरवाढीमुळे सामान्यांना घाम फुटला असतानाच आता चक्क खाऱ्या पाण्यावर चालणारी दुचाकी तयार करण्यात आली असून टेस्ट ड्राइव्हही झाली आहे. अकाेल्यातील पदवीचे शिक्षण घेत असलेल्या पाच मित्रांनी हा आविष्कार केला असून या प्रयोगात आणखी सुधारणा हाेण्यासाठी या रँचाेंना सरकार आणि समाजाकडून आर्थिक पाठबळासह अन्य सहकार्य हवे आहे.
पेट्राेल, डिझेलचे दर गगनाला भिडत असून इंधनावर हाेणारा खर्च वाचावा, यासाठी अन्य पर्यायांचाही अवलंब करण्यात येत आहे. अशातच आता अकाेल्यातील पाच युवकांनी इंधनाचा खर्च वाचावा आणि पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धनही व्हावे, यासाठी पाण्यावर चालणारी दुचाकी तयार केली आहे. काैलखेड परिसरात राहणाऱ्या यश जायले, शंतनू झाकर्डे, अभिजित धर्मे, मंदार कल्ले आणि महेश घाटे या पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या मित्रांना एका वेगळ्याच कल्पनेने झपाटले. ही कल्पना हाेती खाऱ्या पाण्यावर चालणारी दुचाकी तयार करण्याची. या सर्वांच्या मनात चार वर्षांपासून हा विचार सुरू हाेता. अखेर ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी कंबर कसली. टाळेबंदीच्या काळात त्यांनी या प्रयाेगाला सुरुवात केली. अखेर आठ महिन्यांनंतर त्यांच्या प्रयोगाला यश मिळताना दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
बलूनमध्ये वायूने सुरू होते इंजिन
रसायनशास्त्रातील “इलेक्ट्रोलिसिस’ तत्त्वाचा वापर करून खाऱ्या पाण्यावर चालणाऱ्या दुचाकीचा प्रयोग प्रत्यक्षात साकारला. पाण्यातील घटक असलेल्या हायड्रोजनचे ऑक्सिजनच्या साहाय्याने ज्वलन करून त्याचे वायुरूपात जतन केले जाते. बलूनमध्ये जमा वायूच्या साहाय्याने इंजिन सुरू हाेते व दुचाकी धावू लागते. यासाठी लागणाऱ्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करणारे तीन हायड्रोजन सेलही याच मित्रांनी तयार केले आहेत. गाडी सुरू झाल्यावर इंजिन स्वत:च बॅटरीला चार्ज करण्याची व्यवस्थाही आहे.
एक लिटर पाणी अन् प्रतितास ४० किमी वेग
एक लिटर खाऱ्या पाण्यात ही दुचाकी प्रतितास ४० किमी वेगाने तीन तास धावू शकते. वेग वाढवल्यास तीन तासांचा वेळ कमी होऊ शकताे. या प्रयोगाचे पेटंट मिळवण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, प्रयोगासाठी या विद्यार्थी मित्रांना पैशांची कमतरता भासत आहे. ही दुचाकी ६० ते ७० हजारांत उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
असे आहेत फायदे
प्रयाेगात हायड्रोजन घटक असल्याने पेट्रोलपेक्षा तिप्पट परिणामकारक आहे. यातून इंधनाचा वापर आणि दर याला आळा बसेल. कार्बन डायऑक्साइडऐवजी पाण्याची वाफ उत्सर्जित होत असल्याने पर्यावरणाचे संवर्धन होईल, असा दावा करण्यात येत आहे.
दुचाकींच्या सुट्या भागांतून तयार केली गाडी : वापरण्यायाेग्य अन्य दुचाकींचे सुटे भाग वापरून या मित्रांनी गाडी तयार केली. विशेष म्हणजे गाडी चालताना यातून कार्बनचे उत्सर्जन होत नाही, असा दावा करण्यात येत आहे. यातून केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.