आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्राम वणी वारूळा येथील एका युवकाला उपचारासाठी नेत असलेली रुग्णवाहिका वाटेतच पंक्चर झाली. यावेळी रुग्णवाहिकेत पर्यायी टायर उपलब्ध नव्हते त्यामुळे तब्बल एक तास रुग्णवाहिका रुग्णासह रस्त्याच्या कडेला उभी होती. मुख्य म्हणजे पर्यायी रुग्णवाहिका वेळेत पोहोचलीच नाही. अखेर उपचाराअभावी युवकाने रुग्णवाहिकेतच जीव सोडला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी पळसोद फाट्यानजीक घडला. सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी शासनाने १०८ रुग्णवाहिका सुरू केली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कित्येकदा रुग्णवाहिका वाटेतच बंद पडलेली दिसून येते. २ एप्रिल रोजी अकोट ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेला रुग्ण रोशन निरंजन पळसपगार (वय वर्ष १९ रा. वणी वारूळा) याची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी १०८ रुग्ण वाहिकेने अकोला येथे नेण्यात येणार होते.
अकोट-अकोला रस्त्याचे काम गेली कित्येक वर्ष अपूर्ण असून, खराब रस्त्यामुळे रुग्ण वाहिकेचे मागील चाक वाटेतच पळसोद फाट्यानजीक पंक्चर झाले. रुग्णवाहिकेत पर्यायी टायर उपलब्ध नसल्यामुळे आणि दुसरी पर्यायी रुग्णवाहिका यायला तब्बल २.३० तास वेळ असल्याने वेळेत उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण वाहिकेत पर्यायी व्यवस्था असती तर रुग्ण वाचला असता. रुग्णवाहिकेच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे युवकाला जीव गमवावा लागला, अशा संतप्त प्रतिक्रीया यावेळी स्थानिक नागरिक व्यक्त करत होते.
पर्यायी व्यवस्था नसल्याने काही करता आले नाही
अकोटहून अकोला येथे १०८ रुग्णवाहिकेने नेत असताना रुग्णाची परिस्थिती खूप खराब होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांकडून आवश्यक लेखी बयाणसुद्धा लिहून घेतले होते. वाटेतच पळसोद फाट्या जवळ गाडीचे मागचे टायर पंक्चर झाले. गाडीत पर्यायी व्यवस्था नसल्याने आणि दुसरी रुग्णवाहिका येण्यास वेळ असल्याने रुग्ण दगावला. - डॉ. रेशमा कांकळ, १०८ रुग्णवाहिका समन्वयक
...तर आज माझा भाऊ वाचला असता
गाडी पंक्चर झाली त्यावेळेस गाडीचा ड्रायव्हर जवळपास एक तास गाडीजवळच उभा होता. दरम्यान माझ्या भावाची प्रकृती खूप खराब झाली. मी गाडीत असलेल्या डॉक्टरांना याबाबत सांगितले, पण त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. वेळेवर उपचार भेटले असते तर आज माझा लहान भाऊ वाचला असता. - अनिल नि. पळसपगार, मृताचे मोठे भाऊ
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.