आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतील महत्त्वाची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाने गेल्या अनेक महिन्यापासून दीर्घ रजेवर गेलेल्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे महापालिकेत आता आयुक्त वगळता प्रशासनात एकही वरिष्ठ अधिकारी नाही. याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर येत असून मनपा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त हे प्रशासनातील महत्वाची पदे मंजुर आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्ताचे एक तर सहाय्यक आयुक्तांचे तीन पदे रिक्त आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त वगळता इतर पदाचा प्रभार देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उपायुक्त डॉ.पंकज जावळे यांची बदली झाल्या नंतर दोन्ही उपायुक्तांची पदे रिक्त झाली होती.
शासनाने दोन पैकी एका जागेवर श्री.प्यारेवाले यांची नियुक्ती केली. तर चार सहाय्यक आयुक्तांपैकी तीन पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. केवळ पुनम कळंबे या चार वर्षापासून कार्यरत होत्या. श्री.प्यारेवाले रुजु झाल्या पासूनच बदलीच्या प्रयत्नात होते. तर चार वर्ष झाल्याने पुनम कळंबे देखिल बदलीच्या प्रयत्नात होते. बदलीच्या प्रयत्नामुळे हे दोन्ही अधिकारी दोन ते तीन महिन्यापासून दिर्घ रजेवर गेले होते. त्यामुळे कामकाज चालविण्यासाठी उपायुक्ताचा प्रभार बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान दिर्घ रजेवर गेलेले श्री.प्यारेवाले आणि पुनम कळंबे यांच्याही आता बदल्या झाल्या. श्री.प्यारेवाले यांची नागपूर महापालिकेत तर पुनम कळंबे यांची वर्धा जिल्ह्यातील शेलु नगर पंचायतीवर मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. त्यामुळे आता महापालिकेत आयुक्त वगळता एकही प्रशासनातील अधिकारी नाही.
अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त ही महत्वाची पदे रिक्त असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच कामकाजाचा गाडा चालवावा लागत आहे. हे कामकाज चालविताना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने वारंवार प्रशासनाची बोलणी खावी लागतात. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे.
जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. महापालिकेत नियुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. तुर्तास महापालिकेत विविध योजना राबविल्या जात असून अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकर सुरु होणार आहे. त्यामुळे रिक्तपदे भरण्याबाबत पाठपुरावा कोण करणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.