आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात यू-डायस (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने शाळांची नोंदणी व संपुर्ण माहिती भरण्याचा उपक्रम राज्य शासनाच्या शिक्षण विभागाद्वारे राबवण्यात येतो. राज्यात एकूण १ लाख १० हजार २३० शाळा असून, आतापर्यंत ९२.८३ टक्के शाळांनी शाळेची संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने भरली आहे. मात्र, यामध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्हा हा शेवटून दुसऱ्या स्थानी म्हणजेच ३५ व्या क्रमांकावर आहे. तर सिंधुदुर्ग व गोंदिया जिल्ह्याने माहिती भरण्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पूर्वी राज्यातील महानगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, खासगी, अनुदानित व विना अनुदानित, आदिवासी विभागाच्या शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, कायम विना अनुदानित शाळा, मदरसे, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा आदींची संपूर्ण तपशीलवार माहिती ऑफलाईन पद्धतीने भरली जात होती. त्यामध्ये पारदर्शकता यावी, तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी शाळांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासनाद्वारे यू-डायस प्लस प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गामधील विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच अन्य माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येते.
राज्यातील १ लाख १० हजार २३० शाळांपैकी १ लाख २ हजार ३२४ शाळांनी म्हणजेच ९२.८३ टक्के शाळांनी आपली संपुर्ण माहिती भरली आहे. ५ हजार ३०७ शाळांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे, तर राज्यातील २ हजार ५९९ शाळांनी अद्यापही माहिती भरायला सुरूवात केली नसल्याचे वास्तव असून त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा पहिला नंबर आहे.
सर्वत्र हाेतो या माहितीचा उपयोग : यू-डायस प्रणालीत भरलेल्या माहितीचा उपयोग शासनाच्या सांख्यिकी, सॅनिटेशन, आरोग्य आदींसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये केला जातो. सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, शिक्षक संख्या आणि पदे यांचा आढावा दरवर्षी यू-डायसमार्फत घेण्यात येतो. त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीमधूनच केंद्र व राज्य सरकारकडून निधीचे नियोजन केले जाते. ९० टक्क्यांच्या वर नोंदणी झालेले जिल्हे
यू-डायस प्रणालीमध्ये ९० टक्क्यांच्या वर नोंदणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग व गोंदिया (९९.९४), बुलडाणा (९९.६०), जालना (९८.४१), उस्मानाबाद (९८.३१), भंडारा (९७.६४), सांगली (९७.२९), चंद्रपूर (९६.६९), जळगाव (९६.५३), नांदेड व बृहन्मुंबई (९६.४१), हिंगोली (९६.३१), रत्नागिरी (९५.७६), वर्धा (९५.६८), परभणी (९५.६६), सातारा (९४.२५), नाशिक (९३.८७), वाशीम (९२.९२), रायगड व गडचिरोली (९२.७५), ठाणे (९२.६२), धुळे (९२.५७), बीड (९२.२३), यवतमाळ (९२.०६), अहमदनगर (९१.८८), सोलापूर (९१.७४), कोल्हापूर (९१.५०), पुणे (९०.९२), अकोला (९०.७५) व नंदुरबार (९०.६६) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.