आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड पॉझिटिव्ह:जिल्ह्यात बाधिताच्या संपर्कात आलेला आठ वर्षांचा बालक कोविड पॉझिटिव्ह ; दोन दिवसांत तीन रुग्ण

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

जिल्ह्यात सलग दुसऱ्याही दिवशी एका रुग्णाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ३ झाली. बाधित रुग्ण हा मनपा हद्दीतील ८ वर्षीय आहे. दरम्यान दोन दिवसांत जिल्ह्यात तीन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र १५ दिवसात जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या विविध भागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच अकोल्यातही एक दोन या संख्येने रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या बेफिकीरीवर यंत्रणेचे लक्ष नसल्याने संसर्ग वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो. बुधवारी, ८ जूनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरटीपीसीआर चाचण्यांच्या अहवालाता दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एका पुरुषाचा समावेश असून, ते रेल ता. अकोट व मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत. दरम्यान गुरुवारी आरोग्य विभागाने संपर्क साखळीचा शोध घेत बाधिताच्या संपर्कातील काही नागरिकांचे नमूने चाचणीसाठी घेतले. यापैकी एका आठ वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तो अकोला शहरातील रहिवासी असल्याची माहिती जीएमसीतील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. १७४ अहवाल प्राप्त : जिल्ह्यात गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून सायंकाळी पाचवाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणी आरटीपीसीआरचे १७४ अहवाल प्राप्त झाले. यात एक अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ६५१८४ झाली. ६४०१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पंधरा दिवसात आढळून आले पाच रुग्ण गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा कोविडमुक्त होता. २३ मे रोजी एका ज्येष्ठ नागरिकाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर बाधिताच्या संपर्कातील आणखी एक जण कोविड बाधित आढळला. हे दोघे रुग्ण ठीक झाल्यानंतर ८ जूनरोजी दोन आणि ९ जूनरोजी एक रुग्ण आढळला आहे. लहान मुले, ज्येष्ठांना जपा लहान मुलांसह प्रतिकार शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लागण होण्याची शक्यता असल्याने बालके आणि ज्येष्ठांची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. शहरात सद्यःस्थितीत पाच ठिकाणी कोविड चाचण्या होत आहेत. त्यामुळे लक्षणे असल्यास आवर्जून तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेच्या नोडल अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...