आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न आराेग्याचा:शहरामध्ये डेंग्यूसदृश आजाराची साथ; खासगी ओपीडीत 70% रुग्ण तापाचे

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यानंतर शहरात आता डेंग्यू सदृश तापाने तोंड वर काढले आहे. खासगी रुग्णालयात व्हायरल फ्लू आणि डेंग्यू सदृश्य तापांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल आहेत. यामध्ये बालरुग्णांची संख्या अधिक असल्याचे खासगी रुग्णालयांमध्ये दिसत आहेत. तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या आदी लक्षणांवर रुग्ण उपचार घेत आहेत.

शहराच्या विविध भागात डासांची उत्पती वाढल्याने तापांची फणफणही वाढत आहे. बालरोगतज्ज्ञांच्या मते खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असून, अनेकांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून येत आहेत. डेंग्यूच्या रॅपिड चाचण्यांमधून प्राप्त रिपोर्टच्या आधारे डेंग्यू सदृश्य म्हणून या रुग्णांवर लक्षणांच्या आधारे उपचार करण्यात येत आहेत. मात्र शासनाच्या लेखी सध्या महापालिका क्षेत्रात केवळ दोन संदिग्ध रुग्ण आहेत. दुसरीकडे शहरात आणि लगतच्या वसाहतींमध्ये असलेल्या मोकळ्या भुखंडांवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून आहे. मनपा प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसाच डेंग्यू आणि कीटकजन्य आजारांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डेंग्यू आणि चाचण्या ः खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू सदृष्य रुग्णाच्या एनएस १ आणि आयजीएम, आयजीजी या कार्ड टेस्ट केल्या जातात. यातून आलेल्या रिपोर्टनुसार उपचार केले जातात. मात्र डेंग्यूच्या निदानासाठी शासनाकडून एलायझा या चाचणीला खात्रीशीर समजले जाते. या चाचणीत संदिग्ध रुग्णाच्या रक्ताचा नमुना व्हीआरडीएल प्रयोगशाळेत तपासला जातो. वेळखाऊ प्रक्रियेमुळे रुग्ण आर्थिक भुर्दंड सोसून खासगी रुग्णालयात उपचार घेऊन मोकळे होतात.

रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ
तापाचे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्णांत लक्षणे डेंग्यूची असली तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाही. त्यामुळे डेंग्यू सदृश्य रुग्ण गृहित धरून उपचार करण्यात येत आहेत. अनेक व्हायरस हे मिळतेजुळते असल्याने लक्षणे सारखी दिसेतात. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी परिसरात पाणी साचू न देता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.
डॉ. विजय चव्हाण, बालरोगतज्ज्ञ.

रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी
रक्ताची तपासणी करणाऱ्या एका खासगी लॅबच्या माहितीनुसार डेंग्यू सदृश्य म्हणून अनेक रुग्ण रक्त तपासणीसाठी येतात. तपासणीमध्ये रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झालेली आढळून येत आहे. मात्र दुसरीकडे डेंग्यूसाठी वैद्यकीय चाचणी निगेटिव्ह येत असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...