आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला पाणी पुरवठा करणारी ६०० मिलीमीटरची जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी धावपळ केली. या वाहिनीचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र फुटलेली जलवाहिनी ही शहराला पाणी पुरवठा करणारी नसून, ही जलवाहिनी एका शेतकऱ्याची आहे, हे समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी हुश्श केले. मात्र या दरम्यान अधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली. अकोला पाणी पुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र अकोल्यापासून ३२ किलोमीटरवरील महान येथे आहे. महान जलशुद्धीकरण केंद्रातून ६०० मिली मीटर,९०० मिलीमीटरच्या जलवाहिनीतून जलकुंभांना पाणी पुरवठा केला जातो. ६०० मिलीमीटरची जलवाहिनी १९७८ मध्ये टाकलेली आहे. त्यामुळे ही जलवाहिनी आता क्षतिग्रस्त होत चालली आहे. परिणामी थोडा अधिक दाब वाढला की जलवाहिनी फुटण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून हाेत आहेत. आताही पाणी पुरवठा विभागाने ६०० मिलीमीटरच्या जलवाहिनीवरील लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीची कामे आहेत. या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागाने बार्शिटाकळी शहरालगत मुख्य जलवाहिनीवरील अवैध नळजोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठीच अकोल्यावरुन निघालेल्या कंत्राटदारांस कान्हेरी सरप जवळ जलवाहिनी फुटलेली आढळून आली. संबंधित कंत्राटदाराने पाण्याचा अपव्यय होवू नये,
यासाठी जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी धावपळ करीत कान्हेरी सरप गाठले. या दरम्यान सुरू असलेला पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी गेल्यानंतर ही फुटलेली जलवाहिनी महापालिकेची नसून, ती एका शेतकऱ्याची असल्याचे समोर आले. फुटलेली जलवाहिनी शहराला पाणी पुरवठा करणारी नसून, शेतकऱ्याची आहे, हे निश्चित झाल्यानंतर पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र या दरम्यान अधिकाऱ्यांची धावपळ झाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.