आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील नागरिकांना पोलिसांचे तत्काळ संरक्षण आणि मदत मिळावे, या हेतूने केसलवाडा गावात पोलीस मदत केंद्र सुरु करण्यात आले. मात्र, काही दिवसातच हे मदत केंद्र बंद पडले आणि ज्या इमारतीत हे पोलिसांचे दूरक्षेत्र केंद्र सुरू होते, त्या घर इमारत मालकाला पोलीस विभागाने भाडे दिले नाही. त्यामुळे घर मालक भाड्यापासून वंचित असून त्याने पोलीस मदत केंद्राची मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथे आता पाळीव जनावरे बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गृह विभागाची पोलीस मदत केंद्राची ही इमारत गुरांचा गोठा बनला आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसलावाडा (पवार) या गावातील पोलीस चौकीचे उद्घाटन भाजपचे तत्कालीन ऊर्जामंत्री तथा आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ३ नोव्हेंबर २०१८ ला करण्यात आले होते. केसलवाडा (पवार) हे गाव नक्षल प्रभावित क्षेत्रात असल्याने या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली होती. काही दिवस या केंद्रातून नियमित कामकाज पार पडले, मात्र, कालांतराने ही चौकी बंद पडली. त्यामुळे पोलीस विभागाचे महत्वाचे दस्तावेज आणि साहित्य आजही त्याच ठिकाणी आहेत. या इमारतीचे भाडे मिळावे, यासाठी घर मालक सतीश ठाकरे यांनी वारंवार पोलिसांच्या वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतरही त्यांना भाडे मिळाले नाही आणि चौकीही सुरू झालेली नाही. त्यामुळे संतप्त घर मालकाने या पोलीस चौकीत स्वतःची जनावरे बांधायला सुरुवात केली आहे.
परिणामी या परिसरातील नागरिकांना पोलीस ठाण्याच्या संदर्भातील कुठलीही समस्या असल्यास १२ किलोमीटरचे अंतर कापून लाखनी पोलीस ठाण्यात पोहोचावे लागते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असून तेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने ही पोलिस चौकी सुरू होण्याची नागरिकांना प्रतिक्षा आहे.
चौकीसाठी १४ पदे मंजूर
लाखनीचे पोलीस निरीक्षक मंडलवार यांच्या अधिपत्याखाली ही चौकी सुरू करण्यात आली. ही चौकी नक्षल प्रभावित क्षेत्रात असल्याने या चौकीसाठी १४ पदांची मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला दोन महिने येथून सुरळीत काम झाले, मात्र त्यानंतर चौकीत कुणीच कर्मचारी येत नसल्याने कालांतराने ही चौकी बंद झाली आणि पोलीस विभागाचे सर्व साहित्य आणि महत्त्वाचे दस्तावेज आजही त्या इमारतीत धूळखात पडून आहेत. नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील पोलिस चौकीत अशाप्रकारे जनावरे बांधण्यात येत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.