आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरासरी ओलांडणार:शेतकऱ्यांनो पेरणीची घाई नको, जूनमध्ये पावसाचा खंड; महाराष्ट्रात 15 जुलैपासून झडझिंबड

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका. कारण यावर्षी वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जूनमध्ये पावसाच्या आगमनातच खंड राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 15 जुलैपर्यंत याच पद्धतीने राहणार असून, त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत पावसाचे प्रमाण चांगले राहील. महाराष्ट्रात सरासरीच्या 101 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ तथा कृषी हवामानशास्त्राचे माजी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

हवेचा दाब नाही...

जून ते सप्टेंबर मान्सून पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना डॉ. साबळे म्हणाले की, सध्या हवेचा दाब जसा पाहिजे तसा नाही. मान्सूनपूर्व पावसामध्ये उघडझाप आहे. आठ दहा दिवसानंतर पावसाला गती येईल आणि खंड राहतील. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान राहील. आज जरी ही परिस्थिती असली तरी त्यात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, ती कमी आहे. पश्चिम विदर्भामध्ये 100 टक्के पाऊस राहील.

कसे राहील प्रमाण?

अकोला विभागामध्ये 100 टक्के, मध्य विदर्भ विभागात 101 टक्के त्यात नागपूर मध्ये 100 टक्के आणि यवतमाळमध्ये 102 टक्के, पूर्व विदर्भ विभागात 103 टक्के त्यात शिंदेवाही(चंद्रपूर)विभागात 103 टक्के, मराठवाडा विभागामध्ये 100 टक्के पाऊस पडेल त्यातही परभणी, जालनामध्ये 100 टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे. कोकण विभागात 100 टक्के, उत्तर महाराष्ट्रात 100.6 टक्के पाऊस राहील त्यातही निफाड व जळगाव विभागात 100 टक्के तसेच धुळेमध्ये 102 टक्के पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्टामध्ये 100.3 टक्के पाऊस होणार असून कोल्हापूर, शिरोळ, कराड, कृष्णा, पाडेगाव, लाटे, राहुरी, सोनई आणि पुणे विभागात 100 टक्के तर सोलापूरमध्ये 102 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

धूळ पेरणीला नको

विदर्भ व खान्देशमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी होते. आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार धूळ पेरणीला अनुकूल परिस्थिती नाही. कारण पावसाच्या आगमनातच खंड असल्याने धूळ पेरणीला प्रतिकूल वातावरण आहे. खरिपाचा हंगाम हा जून आणि जुलैचा सुरूवातीच्या महिन्यातील पेरण्यांवर अवलंबून असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होईल, असेही डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...