आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकली लावणे हा ज्या - त्या स्त्रीचा प्रश्न:अरविंद जगतापांचे वक्तव्य, म्हणाले - निसर्गाने शेतकरी महिलांचे कुंकू पुसले, त्यावर कोण बोलणार?

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टिकलीसारख्या मुद्दयावर आपल्याकडे खूप बोलले जाते. टिकलीसारखा मुद्दा माध्यमात काही दिवसांपासून चर्चेत आहे. टिकली लावायची की नाही, हा ज्या - त्या महिलेचा प्रश्न आहे. मात्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांमुळे कित्येक महिलांचे कुंकू आणि टिकल्या पुसल्या गेल्यात त्यावर कोण बोलणार ? असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी बोलतं व्हावं, असे वक्तव्य लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी केले.

अकोल्यात आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून ते शनिवारी बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर उपस्थित होते.

संमेलनाला उत्साहात सुरुवात

वाशिम रोडवरील प्रभात किड्स स्कूल परिसरात साकारण्यात आलेल्या स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरीत दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाला शनिवारी (5 नोव्हेंबरला ) सुरुवात झाली. विदर्भ साहित्य संघ अकोला शाखा आयोजित या साहित्य संमेलनात स्व. विशाल डिक्कर स्मुती साहित्यपीठात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

काय म्हणाले पाटेकर?

साहित्याला नवधुमारे फुटायचे असतील तर युवकांचे साहित्य पुढे आले पाहिजे. त्यासाठी युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे ऐश्वर्य पाटेकर म्हणाले. मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे यांनी प्रास्ताविक केले. स्व. मनोहरराव म्हैसाळकर यांचे अकोला शाखेवर प्रेम होते असे सांगत अकोला शाखेने राबविलेल्या विविध साहित्यविषयक कार्यक्रमाची त्यांनी माहिती दिली. 18 युवकांना देण्यात येणार्‍या युवा आयकॉन पुरस्काराविषयी माहिती दिली. आमंत्रक डॉ. रवींद्र शोभणे, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, प्रमुख अतिथी आमदार रणधीर सावरकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सरचिटणीस विलास मानेकर उपस्थित होते. अ‍ॅड. वल्लभ नारे यांनी सूत्रसंचालन केले. विदर्भ साहित्य संघाचे अकोला शाखा अध्यक्ष विजय कौसल यांनी आभार मानले. गझलकार तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक सीमा शेटे यांनी शुभेच्छा संदेशांचे वाचन केले.

बातम्या आणखी आहेत...