आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण पथक जाताच ठेले पुन्हा लागले:गांधी चौक-अकोट फैल पोलिस स्टेशन मार्गावर कारवाई; दररोज राबवली जाणार मोहिम

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने सोमवारी 21 रोजी शहरातील गांधी चौक -शहर कोतवाली-टिळक मार्ग ते अकोट फैल पोलिस ठाणे या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. या मार्गात रहदारीसाठी अडथळा ठरलेले अतिक्रमण हटविण्यात आले. ही मोहिम नियमितपणे शहरातील मुख्य मार्गावर राबविण्यात येणार आहे. दरम्यान अतिक्रमण धारकांना केलेले अतिक्रमण स्वत: काढावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत शहरातील अतिक्रमणाबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खासगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमित हॉकर्स व दुकानांमुळेही रहदारीत अडथळे निर्माण होतात. विशेषत: शहरातील मुख्य मार्गावर हे चित्र सातत्याने अनुभवास येते. यामुळे चोरीच्या घटना तसेच छेडखानीचे प्रकारही घडतात.

या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून शहरातील मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचने नंतर महापालिकेने रविवार २० नोव्हेंबर पर्यंत ज्या लघु व्यावसायीकांनी रस्त्यालगत व्यवसाय थाटला आहे, त्यांनी केलेले अतिक्रमण काढावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली.

गांधी चौक ते शहर कोतवाली तसेच कोतवाली मागील भाग, टिळक रोड, शिवाजी कॉलेज ते अकोट फैल पोलिस ठाणे या मार्गातील पानठेले, चहाच्या टपऱ्या रसवंती गृह, ऑम्लेटच्या गाड्या तसेच अन्य लघु व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण, हटविण्यात आले. ही मोहिम उत्तर झोनचे झोनल अधिकारी विठ्ठल देवकते, हेमंद शेजवणे, सुनिल इंगळे, प्रविण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र टापरे, अक्षय बोर्डे, सय्यद रफिक, वैभव कवाडे, रुपेश इंगळे, शोभा इंगळे, कल्पना उप‌र्वट, कविता सगडे आदींनी राबविली.

काही दुकाने पुन्हा थाटली

प्रशासनाने अतिक्रमण स्वत: काढण्याचे आवाहन केले होते. तसेच अतिक्रमण धारकांना सोमवार पासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु होणार असल्याची माहिती होती. त्यामुळे अनेक लघु व्यावसायीक, भेळपूरी, पाणी पुरी तसेच अन्य व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या चारचाकी गाड्या लावल्याच नाहीत. तसेच ज्यांनी लावल्या, त्यांनी मोहिम सुरु होताच, रस्त्या लगत असलेल्या चारचाकी गाड्या काढून घेतल्या. पथकाची मोहिम पूर्ण झाल्या नंतर पथक माघारी परतले आमि अनेकांनी आपली दुकाने पुन्हा थाटली. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिम राबवून फारसा फायदा झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...