आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हैसपूर येथे आयोजित शिव महापुराण कथा कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा आयोजकांनी दिलेला अंदाज पाहता आयोजकांनी कथा स्थळी सुरक्षा, स्वच्छता उपाययोजना कराव्या, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने बुधवारी आयोजकांना दिले.
कथा मंडपाचे स्ट्रक्चरल ऑडिट, मंडपअंतर्गत विद्युत व्यवस्थेचेही सुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट करावे, सभा मंडप, स्वयंपाकाच्या जागी अग्निशमन संयंत्रे ठेवावीत, अन्न, पाण्याचे नमुने तपासावे, अशा सूचनाही दिल्या. शिवमहापुराण कथा आयोजनासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियोजन भवनात बैठकीचे आयोजन केले होते.
आयोजकांकडून ५ मेपासून होत असलेल्या कथा कार्यक्रमाच्या तयारीची माहिती बैठकीत सांगीतली. कथेस जमणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, जेवण, पाणी, स्वच्छता, अग्निशमन, विद्युत यंत्रणा, मंडप उभारणी, वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती सादर केली. या बैठकीस जिल्हाधिकारी नीमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन सागर तेरकर, म्हैसपूरच्या सरपंच मीना इंगळे, ग्रामसेवक आर. बी. अटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दिनकर नागे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश जवादे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, तहसीलदार सुनिल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयोजकांतर्फे विजय दुबे व रुपेश चौरसिया यांच्यासह त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.
अशी राहील सुरक्षा
शिवमहापुराण कथेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलिस यंत्रणा सुरक्षेच्या व वाहतूक नियमनाच्या दृष्टीने तैनात राहणार अाहेत. यात ३०० ते ३५० पोलिस (महिला- पुरुष), अधिकारी, २५० होमगार्ड (महिला- पुरुष) तैनात असतील, असे पोलिस अधीक्षक घुगे यांनी सांगितले. या केल्या सूचना अायाेजकांना प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या.
अशी घ्या दक्षता
समन्वयासाठी राहणार कक्ष
कथा मंडप, स्वयंपाकाची जागा इ. ठिकाणी अग्निशमन संयंत्रे ठेवावी, असे जिल्हा प्रशासनाने सांगीतले. अग्निशमन संयंत्र चालवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन दलाकडून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाईल. कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्वयंसेवकांची व्यवस्था असावी. प्रशासनातर्फे डॉक्टरांसह आरोग्य पथक, चार रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, इ. उपाययोजना करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले . आयोजक , प्रशासनात समन्वय राखण्यासाठी मध्यवर्ती कक्ष कार्यान्वित करावा. आपत्ती व्यवस्थापन दलाची दोन पथके कथास्थळी तैनात असतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.