आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणादायी उपक्रम:ऑगस्ट क्रांतिदिन-स्वातंत्र्यदिन दरम्यान काँग्रेस पक्षातर्फे आझादी गौरव पदयात्रा

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी ब्रिटिश सरकार विरोधात भारत छोडो आंदोलनाची सुरूवात झाली होती. या दिनाचे महत्त्व लक्षात घेता ९ ऑगस्ट ते स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट २०२२ या काळात देशात काँग्रेस पक्षातर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात झालेल्या चर्चासत्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७५ कि.मी. अंतरावर आझादी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही ग्रामीण भागात काँग्रेस पक्षातर्फे १०० कि. मी. अंतरावर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी ९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता गांधीग्राम येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याचे पूजन करून व विनोबा भावेंच्या विचाराने प्रेरीत केळीवेळी येथून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाची पदयात्रा सुरू होणार असून, काटी, पाटी, हिंगणी, गणोरी व दहीहांडा येथून ही पदयात्रा जाणार आहे.

अकोला शहरात सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मारकापासून इन्कम टॅक्स चौक, तुकाराम चौक येथे कॉर्नर सभांचे आयोजन केले आहे. बुधवारी १० ऑगस्टला मूर्तिजापूर तालुक्यातील पिंप्री खरबडी येथून पदयात्रा प्रारंभ होवून ती नागठाणा, नागोली, कुरूम, राजुरा सरोदे, निगोट, कामठी व जामठी येथे जाणार आहे. अकोला शहरात सायंकाळी ६ वाजता कौलखेड चौक ते हिंगणा फाटा, सिंधी कॅम्प खदान, खदान ठाणा येथे कॉर्नरसभाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ११ ऑगस्टला पातूर तालुक्यात आलेगाव येथून पदयात्रा प्रारंभ होवून आलेगाव, कार्ला, आसोला, अंबाशी, विवरा, जामरूण व बाभुळगाव येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे. शुक्रवारी १२ ऑगस्टला अकोट तालुक्यातील अकोलखेड, अंबोडा, मोहाडा, सुकळी, बोर्डी व शिवपूर येथे जाणार आहे.

शनिवारी १३ ऑगस्टला बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी, माणकी, देगाव व वाडेगाव येथे जाणार आहे. रविवारी १४ ऑगस्टला तेल्हारा तालुक्यातील दानापूर, सौदळा, हिवरखेड येथे जाणार आहे. साेमवारी १५ ऑगस्टला बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा, तिवसा व महान येथे जाणार आहे. अकोला शहरात स्वराज्य भवन काँग्रेस कार्यालय येथे झेंडा वंदन कार्यक्रम आझादीच्या ७५ वर्षानिमित्त अकोला शहरात उड्डाण पुलावर १ किलाेमीटर लांब तिरंगा झेंडा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, अकोला जिल्ह्याचे प्रभारी दिलीप सरनाईक, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, महानगर अध्यक्ष प्रशांत वानखडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे, अकोला मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष महेश गणगणे, महेंद्र गवई, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष भुषण टाले , नगरसेवक मो. जमीर बर्तनवाले. मो. युसूफ, अफरोज खान, संजय पेटकर, राजेश नळकांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...