आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात गुरुवारी ९ जूनला रात्री झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाच्या माहितीनुसार सुमारे ५० हेक्टरवरील पिकाला वादळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असून, नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सरासरी ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
गुरुवारी रात्री ११ वाजतापासून जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी घरावरील लोखंडी टीनपत्रे उडून गेली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक प्रभावित झाली हाेती. अकोला शहरात विविध भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळी पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा तालुक्यातील केळीच्या बागांना बसला. हिवरखेड पंचक्रोशीतील केळीची पिके भुईसपाट झाली. शेकडो एकरावरील केळी पिकाची पाने फाटली आहेत. पिके जमिनदोस्त झाली आहेत.
तालुक्यातील हिवरखेड, दानापूर, सौंदळा, कारला, सोनवाडी, हिंगणी, वारखेड, झरी आदी गावात केळीचे नुकसान झाले आहे. हिवरखेड-सोनाळा राज्यमार्ग, दानापूर- सौंदळा व विविध रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. शेतकऱ्यांमधून नुकसानीच्या सर्वेची मागणी होत आहे.
पशुधनाला जपा : पुढील काही दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने जनावरांना बाहेर चरण्यास पाठवू नये. गोठ्याची दुरुस्ती करावी, दुर्घटनांमुळे जनावरांची जीवीत हानी होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाने केले.
तेल्हारा तालुक्यात हिवरखेड, दानापूर, सौंदळा, कारला, सोनवाडी, हिंगणी, वारखेड, झरी आदी गावांत केळी पिकाचे नुकसान झाले. याशिवाय हिवरखेड-सोनाळा राज्यमार्ग, दानापूर- सौंदळांसह विविध रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
पिकाच्या नुकसानाची पाहणी सुरू
तेल्हारा तालुक्यात सुमारे तीनशे हेक्टरवर केळीचे पीक आहे. गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे ५० ते ६० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.
- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा.
तीन दिवसांत पावसाची शक्यता
११ जून : जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस.
१२ जून : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
१३ जून : जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरुपात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.