आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य सवलतीचा लाभ दिला जातो. मात्र सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नसलेल्या सधन नोकरदार, व्यवसायी व शेतकरी लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य अनुदान योजनेतून बाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अपात्र असलेला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असाही इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्यामध्ये १ फेब्रुवारी २०१४ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विविध अटीनुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रति माह ३५ किलो व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह पाच किलो अन्नधान्याचा सवलतीच्या दराने लाभ देण्यात येतो.
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या शिधापत्रिकाच्या आधार सीडींग मुळे योजनेअंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरिता योग्य लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आधारसीडींमुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित व मयत इत्यादी लाभार्थ्यांना वगळण्यात आले असले तरी पात्र लाभार्थ्यांमधील ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्याची आवश्यकता नाही अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेमधून बाहेर पडावे. यामुळे गरजू लाभार्थी इष्टांक मर्यादेमुळे योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा लोकांना योजनेचा लाभ मिळेल. अशी आहे तरतूद : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अपात्र असलेला लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा लाभार्थ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये पाच मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडासह दोन्ही शिक्षेस पात्र राहिल.
भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० नुसार शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल होईल. नियमशिधापत्रिका संबंधात गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी संबंधिताना दिले आहे. यांनी घेऊ नये लाभ : नोकरवर्ग, व्यवसायी व सधन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेवू नये, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यात शासकीय व निमशासकीय नौकरीत असणारे लाभार्थी, खासगी नाेकरी, व्यवसाय करणारे , (ज्यांचे उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे ) चार चाकी वाहन असणारे लाभार्थी, पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणारे सधन शेतकरी व पेंशनधारक लाभार्थ्यांनी अन्नधान्य सवलतीच्या योजनाचा लाभ घेवू नये, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.