आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेगाव येथील नगर पालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या ओल्या कचऱ्यापासून वीज व बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. पाच टन क्षमता असलेल्या या प्रकल्पातून ३५० युनिट वीजनिर्मिती व बायोगॅस निर्माण होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण करणारी शेगाव नगर पालिका जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भातून प्रथम ठरली आहे. हा प्रकल्प शेगाव नगर पालिकेने सर्वात आधी पूर्ण केला आहे.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस
एक कोटी २० लाखांच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर २०२१ मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती. प्रभावी यंत्रणेमुळे दोन वर्षातच प्रकल्प पूर्णत्वास गेला. सध्या ओल्या कचऱ्यापासून वीज व बायोगॅस निर्मिती सुरू झाली असून आधी महिनाभर या प्रकल्पाची ट्रायल चालणार आहे.
या प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेचा वापर कचरा प्रक्रिया केंद्रातील वीज व्यवस्था, स्ट्रीट लाइट व मशिनरीसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर उरलेली वीज ही एमएसईबीला विकत देण्यात येणार असून, यामधून नगर पालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. शासनाकडून असे प्रकल्प राज्यातील अनेक नगर पालिकांना देण्यात आले आहेत. परंतु अद्याप विदर्भात कुठल्याही नगर पालिकेने हा उपक्रम राबवला नाही. शेगाव पालिकेचा अपवाद वगळता इतर सर्व नगर पालिकांनी अद्याप निविदा प्रक्रिया सुद्धा राबवलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत उदासीन धोरण दिसून आले आहे. हा प्रकल्प शेगावला मिळावा यासाठी आ. कुटे यांनी शासन दरबारी प्रयत्न केले होते. शेगाव येथे ओल्या कचऱ्यापासून वीज व बायोगॅस निर्मिती प्रकल्प पूर्णत्वास आला आहे.
उर्वरित वीज महावितरणला देणार
शेगाव नगर पालिकेच्या वतीने ओल्या कचऱ्यापासून वीज व बायोगॅस निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून, हा प्रकल्प कार्यान्वित करणारी शेगाव नगर पालिका विदर्भातील पहिली पालिका आहे. या प्रकल्पावर तयार झालेली वीज प्लँटवर वापरण्यात येईल त्यानंतर उर्वरित वीज महावितरणला देण्यात येईल. - संजय मोकासरे, अभियंता, शेगाव
वीज बिलाची बचत होईल
ओल्या कचऱ्यामुळे रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून हा कचरा संकलित करण्यात येतो व या कचऱ्यापासून वीज निर्मिती व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून बायोगॅस निर्मिती प्रकल्प शेगावसाठी मंजूर करून घेतला व आज तो पूर्णत्वास गेला आहे. या प्रकल्पामुळे नगर पालिकेच्या वीज बिलाची बचत होईल. - आ. डॉ. संजय कुटे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.