आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहाटेचा मंद गारवा, ढगाळ वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि चक्क रहदारी मार्गावर येऊन आपला तोरा मिरवणारे मोर, असे मनमोहक दृष्य सध्या अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात पाहायला मिळत आहे. अगदी पहिलाच पाऊस आणि दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणाने विद्यापीठाच्या परिसरात नवचैतन्य भरले आहे.
विद्यापीठात केकारव
एकीकडे वाढते शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे जंगलांचा होणारा ऱ्हास, यामुळे मोर प्रजाती धोक्यात आली आहे. मात्र, जैवविविधतेने संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या अकोल्यातील कृषी विद्यापीठाने कैक वर्षांपासून येथील मयूरवैभव जपले आहे. पहिल्या पावसानंतर विद्यापीठाच्या बनांमध्ये मोरांचा केकारव घुमत आहे. त्यामुळे येथे मॉर्निक वॉकसाठी येणाऱ्या अकोलेकरांना दररोज मयूर सौदर्याचे विलक्षण दर्शन घडत आहे. पिसारा फुलवून नाचणारे मोर, लांडोर, तर कधी झाडाच्या शेंड्यावर बसलेले, अन्नाच्या शोधात फिरणारे मोर परिसरात सहज दिसून येतात.
240 प्रकारचे पक्षी
सुमारे 1150 हेक्टरहून अधिक परिसर लाभलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध, श्रीमंत आहे. पानथळ, गवताळ प्रदेशात आढळणारे, दलदलीच्या प्रदेशातील पक्षी, जंगलात आढळणारे पक्षी आदी विविध प्रकारातील सुमारे 240 प्रकारचे पक्षी कृषी विद्यापीठाच्या परिसरात आढळतात.
विविध प्रकारचे बदक
पक्षीमित्रांकडून पक्षी निरीक्षणाच्या माध्यमातून पक्षांच्या नोंदी घेतल्या जातात. मोर आणि बदकाचे विविध प्रकार मोठ्या प्रमाणात येथे आढळतात. याशिवाय हंस, घुबड, स्वर्गीय नर्तक, भारद्वाज, पोपट, कोकीळ, ठिपकेवाला नाचरा, साळुंखी, दयाळ, बुलबुल, खंड्या, हिरवट पर्णी वटवट्या, घार, बगडा, चातक, रंगीत करकोचा, आदी अनेक पक्षांच्या अधिवासामुळे येथील पक्षीवैभव संपन्न आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.