आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीचे संकट:बोरगाव मंजू, बाभूळगावपाठोपाठ बार्शीटाकळीमध्ये 30 ते 40 टक्के प्रादुर्भाव, कपाशीच्या पिकांना धोका

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस असल्याने अनेक भागात पिके बहरली आहेत. मात्र, आता बोंडअळीच्या संकटाने तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व बाभूळगावनंतर आता बार्शीटाकळीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिली. विद्यापीठाच्या चमुने केलेल्या पाहणीत कपाशीच्या शिवारात बोंडअळी आढळून आली.

कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे व त्यांच्या चमूने कपाशीच्या शेतांची पाहणी सुरू केली आहे. 1 ऑगस्टरोजी अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व बाभूळगाव परिसरात प्रक्षेत्र भेटीदरम्यान कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ?

- ज्या शेताच्या आसपास कॉटन जिनिंग मिल आहेत व पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात केली आहे. तेथील कपाशीवर फुले, पात्या गुलाबी बोंडअळी ग्रस्त आढळून आल्या आहेत.

- कॉटन जीनिंग मिलच्या बाजुला असलेल्या शेतात प्रत्येक कामगंध सापळ्यामध्ये सरासरी चार ते पाच प्रौढ गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत.

- कॉटन जिनिंग मिल बाजुलाच असल्यामुळे कपाशीच्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सध्यस्थितीत 50 ते 60 टक्के आढळून आला आहे.

60 दिवसांत अळीचा प्रादुर्भाव

बार्शीटाकळी येथे प्रक्षेत्र भेट दिली असून ज्या शेतीच्या आसपास कॉटन जिनिंग मिल आहेत, अशा परिसरातील 60 दिवसांच्या पिकात बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. हा प्रादूर्भाव 30 ते 40 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. या पाहणीच्या वेळी बार्शीटाकळीचे तालुका कृषी अधिकारी विलास वाशिमकर, कृषी सहायक संध्या पाखरे, सहयोगी प्रा. पि. के. राठोड, संशोधन सहयोगी गणेश वाघ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...