आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे नाव बदलून ते जिजाऊ नगर करण्याबाबत मागील काळात करण्यात आलेल्या मागणीनुसार प्रशासनाने एक प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. स्थानिकांचा कोणताही विचार न घेता प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीवर नागरिकांनी एका निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवला आहे. नामांतराचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाने डिसेंबर २०२२ मध्ये या संदर्भात दिलेल्या अहवालाचा संदर्भ या निवेदनात देण्यात आला आहे. सिंदखेडराजा शिवतीर्थाच्या नामावलीत अग्रस्थानी असलेले महत्त्वाचे शहर असून, श्रीमंत मल्हारराव होळकरांनीही या शहराचा मराठ्यांची काशी असल्याचे म्हटले होते.
भारतात काशी क्षेत्राला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व महाराष्ट्रात सिंदखेडराजाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लखुजीराव जाधव आणि त्यांच्या वंशजांनी त्यांच्या परगण्यातील किनगाव, देऊळगाव, आडगाव, मेहुणा या गावांना राजा हा शब्द जोडला. त्यामुळे या गावांना किनगावराजा, आडगावराजा, देऊळगावराजा, मेहुणाराजा असे संबोधले जाते.
या संपूर्ण परगण्याचे मुख्य केंद्र म्हणजे राजधानी सिंदखेडराजा होते असेही या निवेदनात म्हटले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, या शहराला त्यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांचा जाजवल्य इतिहास आहे. नावात बदल करून आपण या इतिहासालाच बगल देत आहोत का, असा प्रश्न या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. शहराचे आहे तेच नाव कायम ठेवण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक आणि जाधव वंशजांनी निर्णय घेतला आहे. यासाठी नगर पालिकेने विशेष सभेत नाव न बदलण्याचा ठराव पारित केला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. शासनाने शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव खारीज करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन देताना शिवाजी राजेजाधव, अॅड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे, छगनराव मेहेत्रे , माजी नगराध्यक्ष नंदाताई विष्णू मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष सीताराम चौधरी, बबनराव म्हस्के, विजयराव तायडे, संदीप मेहेत्रे, पालिकेतील सर्व नगरसेवक, भाजप, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, युवक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.