आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाख रुपयांचा गांजा जप्त:सिनेस्टाईल पाठलाग करून एका आरोपीला अटक, आरोपीला 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 येथे बुधवारच्या रात्री गस्त करीत असताना ग्रामीण पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून 30 किलो ओला गांजा जप्त केला. याबाबत शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून गुरुवारी सायंकाळी आरोपीला 1 ऑगस्टपर्यंतची पोलिस कोठडी ठोकावण्यात आली आहे.

सिनेस्टाईल पाठलाग

याबाबत सविस्तर असे की, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, पोलिस उपनिरीक्षक मानकर तसेच हे.कॉ.विजय मानकर व पो. काँ. सुदाम धुळगुंडे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर 27 जुलैच्या रात्री गस्त करीत होते. रात्री 11 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ एक मोटरसायकल व एक चारचाकी कार यांच्यामध्ये संशयास्पद हालचाली व काहीतरी साहित्याची आदान प्रदान होत असल्याचे दिसले. त्यांनी आपला मोर्चा या गाड्यांकडे वळवला असता पोलिस गाडी पाहून मोटरसायकल वरील दोघांनी सुसाट पळाले.

तर चारचाकी कारमधून दुसऱ्या आरोपीने देखील पळ काढला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता त्यांनी आपली गाडी रस्त्यावरून अचानक कच्च्या मार्गाने शेतात टाकली आणि यामध्ये त्याची गाडी पलटी होऊन अपघातग्रस्त झाली.

चौकशीत आरोपीची कबुली

पोलिसांनी सदर गाडीत लपून बसलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव फैजानखान लतीफखान वय 22 वर्षे रा. मोमीनपुरा ताजनापेठ अकोला असल्याचे सांगितले. तसेच गाडीत गांजा असल्याची माहिती दिली. तपासात गाडीत अवैधरित्या विक्री करता ठेवलेला गांजा मिळून आला. गोणपाटात पॅक केलेले एकूण सहा पॅकेट ओलसर गांजाचे (कॅनाबीस)आढळून आले. गांजाचे वजन 30 किलो छप्पन ग्राम भरले. या गांजाची किंमत 3 लाख 560 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्या जवळून चार चाकी अपघातग्रस्त कार क्र.एम. एच.12 डी.एम.512 किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आली.

पोलिसांत गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे डी.बी. स्कॉड व इतर पोलिस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. ही घटना मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने याबाबत ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपीचा विरुद्ध अपराध क्रमांक 284-22 कलम 8 क 20 ब (क) एनडीपीएस अँक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यादव करीत आहेत. तपासातून आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.

बातम्या आणखी आहेत...