आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाच्या कठड्यावर धडकली एसटी बस:वाहक गंभीर जखमी; 12 प्रवाशांना किरकोळ दुखापत, इतर सुखरूप

नांदगावपेठ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एसटी बसचा बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. पुढे असलेल्या टाटा एस वाहनाला मागून धडक दिल्यानंतर चालक केशव माधव थोटे यांचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस उड्डाणपुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्यावर चढली. पुढील दोन चाके हवेत अधांतरी लटकल्यानंतर बसचा मागील भाग पुलाला अडकल्याने सुदैवाने अनर्थ टळला. या घटनेत बस वाहक गजानन वाघपांजर यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले असून बसमधील १० प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ते उपचारासाठी हाॅस्पीटलमध्येही गेले नाहीत. तर इतर १२ प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती अमरावती एसटीचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली.

नागपूर गणेशपेठ आगाराची औरंगाबाद-नागपूर बस क्रमांक एम.एच.४०,वाय/५८२८ ही बस सायंकाळी ६.३० वाजता अमरावती येथून नागपूरकडे निघाली. नांदगाव पेठ उड्डाणपुलावरून जाताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस उड्डाणपुलावरील कठड्याला जाऊन भिडली आणि पुढील भाग कठड्याच्या वर चढला. घटना घडताच नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. उड्डाणपुलावर अडकलेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. बसचा १५ टक्के भाग पुलाच्या कठड्यावर चढल्यामुळे बसच्या केबिनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अपघाताच्या वेळी या बसमध्ये सुमारे २२ प्रवासी होते, असेही अमरावती एसटी कार्यालयाने सांगितले. वाहक वाघपांजर केबिनच्या काचेसह २० फुट खाली कोसळल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सावदेकर हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नांदगावपेठ उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढलेली एसटी बस.

बातम्या आणखी आहेत...