आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेची घासलेट टाकून जाळून हत्या केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटका करण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) शायना पाटील यांच्या न्यायालयाने दिला.
ज्ञानेश्वर पूर्णाजी सिरसाट (वय २८ रा. उगवा ) असे दोषमुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे. ज्ञानेश्वर याचा विवाह जयश्री यांच्यासोबत झाला होता. आरोप होता की, पती ज्ञानेश्वर हा माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला तगादा लावायचा.
माहेरहून पैसे न आणल्यामुळे तो पत्नीचा शारिरिक व मानसिक छळ करायचा. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र त्याचे वडील पूर्णाजी सिरसाट यांच्यासह सासुरवाडीला जावून त्याने यापुढे चांगले वागवेल, असे हमीपत्र देऊन पत्नीला नांदवण्यासाठी घेऊन आला होता. मात्र, पुन्हा तो पत्नीला त्रास देत होता व २० ऑक्टोबर २००७ रोजी त्याने आईवडिलांच्या मदतीने पत्नीला रॉकेला टाकून पेटवून दिले होते.
जखमी अवस्थेत उपचारासाठी पत्नीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. यावेळी तहसीलदारांनी तिचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवले होते. अशा आरोपावरून अकोट फैल पोलिस ठाण्यात पती ज्ञानेश्वर, त्याचे वडिल पूर्णाजी व आईविरूद्ध भादंविचे कलम ४९८ अ, ३२४, ३०४ ब, ३०२ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. घटनेनंतर ज्ञानेश्वर फरार झाला होता. २०२१ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली व आजपर्यंत तो कारागृहातच होता.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर, त्याचे वडील व आईविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान खटला सुरु असता ज्ञानेश्वरचे आई-वडिल मरण पावले. त्यानंतर एकट्या ज्ञानेश्वरवर खटला चालला. न्यायालयाने सरकार पक्ष व आरोपी पक्षाची बाजू ऐकून सबळ पुराव्याअभावी आरोपी ज्ञानेश्वर पूर्णाजी सिरसाट याला दोषमुक्त केले. आरोपीच्या वतीने अॅड. चंद्रशील दंदी यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.