आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट स्टॅम्प बनवून 20 विद्यार्थ्यांना दिले दाखले:सहायक शिक्षकाचा प्रताप, मुख्यध्यापकांकडून सीईओंकडे तक्रार

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्हा तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अडगाव बु. केंद्रातील सिरसोली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील केंद्रप्रमुख व सहायक शिक्षकाने संगनमत करून बनावट स्टॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चांगली खळबळ उडाली आहे. यांच्याकडून एकाच दिवशी तब्बल 20 विद्यार्थ्यांना दाखला देण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे(सीईओ) तक्रार नोंदविली आहे. मुख्याध्यापक गावंडे काही दिवसांपवूीर् सुट्टी गेल्या होत्या. दरम्यान बनावट स्टॅम्प बनवून केंद्रप्रमुख कोल्हे व सहायक शिक्षक रवींद्र उमाळे यांनी संगनमत करून 20 विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला दिला. अशी तक्रार मुख्याध्यापकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा सोडण्याचे दाखले कोणत्या आधारावर देण्यात आले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिक्षकांविरूद्ध अन्य तक्रारी

या शाळेमध्ये महिला शिक्षिका अधिक आहेत. महिला शिक्षकांना या शिक्षकांकडून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. याबाबत यापूर्वी सुद्धा ही तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे आता तरी प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतिने करण्यात आली आहे.

अवैध कामामागील कारण काय?

मुख्याध्यापकांच्या गैरहजेरीमध्ये केंद्र प्रमुख आणि सहायक शिक्षकाने हा प्रताप केला. यामागे कुठले कारण आहे? यावर सध्या सर्वत्र चर्चा दिसून येत आहे. हा गैरप्रकार करण्यासाठी एखाद्या खाजगी शाळेला लाभ मिळविण्याचा हेतू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत सविस्तर चौकशीनंतर कारणे स्पष्ट केल्या जातील असे जिल्हा प्रशासनाकडून सध्या कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता केंद्र प्रमुख आणि सहायक शिक्षकावर कुठली कारवाई होईल? याकडे अकोल्याच्या संपू्र्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...