आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 3-4 दिवसांत जोरदार पावसाची शक्यता:जिल्ह्यात ढगाळ वातावरण; विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम सरी

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन ते चार दिवसाच्या खंडानंतर अकोला शहर परिसरात रविवारी 21 ऑगस्टला दुपारी अडीच वाजेच्या सुमारात रिमझिम पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण व हवेत गारवा होता.

सुर्यदर्शनाचे झाले दर्शन

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सलग पावसाची हजेरी होती. यामुळे शेतशिवारात पावसाचे पाणी साचून शेतीची कामे खोळंबली होती. त्यानंतर सुमारे आठवडाभर जिल्ह्यात सूर्यदर्शन झाल्याने उकाडा जाणवत होता. पुन्हा दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी अडिचनंतर विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

सर्वत्र पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र, नागपूर यांनी 18 व 19 ऑगस्टरोजी जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर 20 व 21 ऑगस्टला सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असा अंदाज होता. आता 22 ऑगस्ट बहुदा सर्वत्र ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची संभावना आहे.

वेगवान वारे

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील वादळ आता मध्य प्रदेशातील उमरीया जवळ आहे. उद्यापर्यंत ते कमजोर होण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भात आज वेगवान वारे चालणार आहेत.

22 ते 28 पाऊस

रविवारी अमरावती, अकोला व काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. याशिवाय 22 ते 28 ऑगस्ट या कालावधित विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस राहू शकतो.

कृषी विद्यापीठाचा सल्ला

मागील आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले असल्यास, सर्वप्रथम शेतातले साचलेले पाणी शेताबाहेर काढावे. जमिनीत वाफसा स्थिती येताच आंतरमशागतीची कामे आटपावी. अती पावसामुळे पिकाची पाने पिवळी पडली असल्यास अमोनियम सल्फेट प्रती 100 ग्रॅम किंवा पोटॅशियम नायट्रेट प्रती 150 ग्रॅम किंवा युरिया प्रती 100 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...