आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारदर्शकता:वन नेशन, वन गोल्ड रेट पॉलिसीमुळे होणार बदल; सोन्याच्या व्यवहारात येणार पारदर्शकता

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या स्थानानुसार सोन्याचा दर वेगवेगळा असतो. आयात केलेले सोने वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी येणाऱ्या वाहतूक खर्चामुळे प्रत्येक शहरात सोन्याचा भाव वेगळा-वेगळा पाहायला मिळतो. यामुळे शासन लवकरच सोन्याच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ‘वन नेशन, वन गोल्ड रेट' योजना लागू करणार आहे. त्यामुळे सर्वत्र एकाच दरात सोने मिळणार आहे.

बाजारपेठांमध्ये त्यांच्या सराफांच्या संघटनांकडून ठरवल्या गेलेल्या सोन्याच्या किमती लागू होत असतात. सोन्याचे दर अर्थात बोर्ड रेट हे वाहतुकीचा खर्च, स्थानिक कर, सराफा संघटना अशा निरनिराळ्या घटकांच्या प्रभावामुळे या बाजारपेठांमध्ये वेगवेगळे असतात. मात्र सध्या देशाने जीएसटीच्या रूपात एक-सामायिक कर प्रणालीचा अवलंब सुरू केला आहे. या व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे किमतीच्या भिन्नतेचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर होत आहे.

शिवाय सुवर्ण आभूषणांतील सोन्याच्या दर्जाचे प्रमाणीकरण करणाऱ्या हॉलमार्किंगची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच बाजारपेठांमध्ये सोन्याची एकच किंमत लागू करण्याच्या कल्पनेला अधिकच महत्त्व प्राप्त होत आहे. मुख्य म्हणजे सामायिक सोन्याच्या किमतीचे सर्वत्र काटेकोरपणे पालन झाल्यास, सोन्याच्या तस्करीला आपोआप पायबंद घातला जाणार आहे.

सराफासाठीही योजना सोयीची : अकोला येथील सराफा व्यावसायिकाकडून या पॉलिसीचे स्वागत करण्यात येत आहे. वेगवेगळ्या दरांमुळे स्थानिक पातळीवरही व्यवहार किचकट होतात. प्रत्येक शहरामध्ये भिन्न-भिन्न कर, नियम, अटी असतात. याचे पालन करणे व्यावसायिकांसाठीही अडचणीचे ठरते. या योजनेमुळे या अडचणी दूर होतील, असे यानिमित्त सराफा व्यावसायिक शाह ईश्वरदास अॅन्ड सन्सचे अमित शहा यांनी सांगितले.

‘वन नेशन, वन गोल्ड रेट'चा असा होणार लाभ
काळा बाजारावर निर्बध, कुप्रवृत्तींना पायबंद
कुठेही खरेदी-विक्री व्यवहार ग्राहकांना सोयीचे
किमतींबाबत ग्राहकांची फसवणूक थांबणार
व्यवहारात अधिक पारदर्शकता येणार

बातम्या आणखी आहेत...