आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात 2 लहान मुले गंभीर:श्वानांचा बंदोबस्त करा अन्यथा मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी शहराच्या मलकापूर परिसरात घडली. स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून दोन्ही मुलांना सोडवले. जखमी मुलांवर सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शहरात विविध भागात मोकाट श्वानांचा हैदोस वाढला आहे. नागरिकांनी वारंवार बंदोबस्ताची मागणी करूनही मनपा प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. लहान मुलांना घराबाहेर खेळणे व एकट्याने शाळेत जाणेही भितीचे झाले आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील मलकापूर येथील परी परसोबे ही सहा वर्षाची चिमुकली शाळेमध्ये जात असताना तिच्यावर अचानक एका श्वानाने जीवघेणा हल्ला केला.

अंगणामध्ये खेळत असलेल्या एका तीन वर्षाच्या कबीर गोपनारायण या चिमुकल्यावरही श्वानाने हल्ला केला आहे. या दोन्ही घटनांमध्ये लहान मुलांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आठ दिवसात बंदोबस्त करा अन्यथा गुन्हा दाखल करू : गवई

शहरात भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मनपा प्रशासनाचा निर्बिजीकरणाचा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग गवई यांनी केला आहे. निर्बिजीकरणावर सुमारे सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेने पुढील आठ दिवसात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पराग गवई यांनी दिला आहे.

रहिवाशांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

मुलांवर हल्ला करणारे श्वान पिसाळलेले होते अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. दरम्यान ही श्वान मुलांवर हल्ला करीत असताना परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मुलांना श्वानांच्या तावडीतून सोडविले व उपचारासाठी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

आक्रमक श्वानांमुळे दहशत

शहरातील डाबकी रोड, जुने शहर, बाळापूर बायपास, खडकी, मलकापूर यासह विविध भागात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून ठिकठिकाणी आक्रमक श्वान दिसत आहेत. त्वचारोगामुळे श्वानांच्या शरीरावरील पूर्ण केस गळून श्वानांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे जखमी अवस्थेत आक्रमक झालेल्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...