आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटीतून एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून निसटून आलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख गुरुवारी सुद्धा चर्चेत राहिले. मुंबईत खासदार संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत ते दिसून आल्याने अकोल्यात शिवसैनिकांमध्ये एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून आ. नितीन देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, इतर पक्षात देशमुखांचे हे रचलेले कथानक असल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांचे खास समजले जाणारे देशमुख हे त्यांच्या शब्दावरून माघारी फिरल्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नितीन देशमुख यांचे जिल्ह्यातील शिवसेनेत वजन आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव झाल्यानंतर देशमुखांवर चिखलफेक झाली. त्यानंतर खा. अरविंद सावंत यांच्याकडेही तक्रारी झाल्या होत्या. नितीन देशमुख यांच्या कार्यकाळात शिवसेनेचा जिल्ह्यातील टक्का वाढला असला तरी जिल्ह्यात दोन जिल्हा प्रमुख देण्यात आले होते. त्यानंतर देशमुख नाराज होतील, अशी चर्चा होती. सुरतमधील आपबीती देशमुख यांनी पुन्हा गुरुवारी कथन केली. मात्र, त्यांची आपबीती हे रचलेले कथानक असल्याचे अनेकांना वाटते. आपल्याला शिवसेनेने खूप काही दिले. त्यामुळे बंडाचा प्रश्नच नाही. ज्यांनी बंड केले त्यांनी परत यावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
बच्चू कडू गुवाहाटीत, पण कार्यालयातील कामे सुरू
जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हेसुद्धा बंडखोर आमदारांसोबत असल्याने सत्तांतर झाल्यास त्यांचे सरकारमधील नेमके स्थान काय असेल, मंत्रीपद मिळाले तरी ते अकोल्याचे पालकमंत्री कायम राहतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी पालकमंत्री कार्यालयातील कामे मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
अस्वस्थ शिवसैनिकांनी सोडला मोकळा श्वास
मंगळवारी आ. नितीन देशमुख यांचे नाव बंडखोर आमदारांमध्ये आल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. मात्र, त्यांच्या यूटर्नने आणि आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याची भूमिका जाहीर केल्याने शिवसैनिकांनी मोकळा श्वास घेतला. मात्र, देशमुख यांच्या विरोधी गटातील चर्चाही थांबल्या आहेत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.