आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निवडणुकीत प्रभाग 3 चा की 4 सदस्यांचा?:कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम, शासनाच्या पत्रात थेट निर्देश नाही

अकोला7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या वतीने महापालिकेला देण्यात आले आहे. मात्र निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग की चार सदस्यांचा? याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. तसेच प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश हे निवडणुक विभागाकडून येणे अपेक्षित असताना शासनाने असे आदेश पाठविल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिकेची मुदत मार्च 2022 मध्ये संपुष्टात आली. त्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात महापालिका निवडणुका अपेक्षित होत्या. मात्र कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम पुढे ढकलल्या गेले. या दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडीने एकल सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा निर्णय घेतला. हा निर्णय बदलुन तीन सदस्यी प्रभाग रचनेचा निर्णय घेतला.

या दरम्यान इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोचला. या दरम्यान एका प्रभागातून तीन सदस्य या नुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली. यावर आक्षेप घेवून सुनावणीही घेण्यात आली. ओबीसी सोडून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानंतर ओबीसींचा निर्णय झाल्याने पुन्हा सोडत घ्यावी लागली. आता निवडणुका जाहीर होवू शकतात, असे दिसत असताना राज्यात सत्तातर झाले. शिंदे - फडणवीस गटाचे सरकार आले. या सरकारने 2017 नुसार प्रभाग रचनेचे आदेश दिले. तसेच महाविकास आघाडीने वाढवलेली सदस्य संख्येचा निर्णयही रद्द केला. हे प्रकरणही न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे अद्याप निवडणुक आयोगाने महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून किती सदस्य निवडून दिले जाणार? याबाबत कोणताही आदेश जारी केला नाही. मात्र नगरविकास खात्याने महापालिकांना प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याच्या हेतूने कामाला लागण्याचे आदेश दिले.

नगर विकास विभागाने तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असे आदेश दिले आहेत. पण नेमकी कोणती कार्यवाही करावी? असा प्रश्न अधिकारी - कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तसेच प्रभाग रचनेबाबतचे आदेश निवडणुक विभागाकडून आल्या नंतरच कार्यवाहिला प्रारंभ केला जातो. मात्र हा आदेश नगर विकास विभागाने दिल्याने संभ्रमात भर पडली आहे.

2017 साली एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले होते. ही प्रभाग रचना तयार आहे. तर एका प्रभागातून तीन नगरसेवक यानुसार केलेली प्रभाग रचनाही तयार आहे. मात्र ही रचना 91 नगरसेवक गृहित धरुन करण्यात आलेली आहे. त्यामुळे एका प्रभागातून चार सदस्याचा प्रभाग झाल्यास मागील प्रभाग रचनाच कामात येईल. मात्र तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यास आणि नगरसेवकांची संख्या 80 राहिल्यास पुन्हा नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...