आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसतर्फे रास्ता रोको:अग्निपथ योजना, जीएसटी, महागाईविरोधात निदर्शने; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

प्रतिनिधी |अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई , बेरोजगार, अग्निपथ योजना व जीवनावशक्य वस्तूंवर लावलेल्या जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने शुक्रवारी रस्त्यावर धाव घेतली. महानगरासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही आंदोलन करण्यात आले. अकोल्यातील मदनलाल धिंग्रात चौकात (मध्यवर्ती बस स्थानक) रास्ता रोको करीत काँग्रेसने निदर्शने केली.

भाजपवर हल्लाबोल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सामान्य नागरिकांसह व्यापारीही आर्थिकदृष्टया अडचणीत आले. अशातच वाढत्या इंधनदरामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाचे दरही वाढतच आहेत. वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी महागाईसह अन्य मुद्यांवर काँग्रेसने रस्त्यावर धाव घेत केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

आंदोलनात महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, बबनराव चौधरी, डॉ. झिशान हुसेन, साजदि खान पठाण, कपिल रावदेव, प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, आकाश कवडे, सागर कावरे, रवी शिंदे, मो. इरफान यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अग्निपथला विरोध

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अग्निपथअंतर्गत जाहीर केलेल्या अग्नीवीर योजनेला अनेक राज्यात विरोध झाला. या योजनेनुसार इंडियन आर्मीमध्ये तरुणांना ४ वर्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेनुसार दरवर्षी ४६ हजार युवकांची निवड करण्यात येणार आहे. चार वर्ष संपताना त्यापैकी २५ टक्के युवकांना सैन्यदलात नोकरी मिळेल. इतर युवकांना चार वर्षांचा कालावधी संपताना जवळपास ११ लाख रुपये मिळणार आहेत. काँग्रेसने या योजनेला विरोध केला. काही दिवसांपूर्वी बस स्थानकाजवळ घोषणा देत आंदोलन केले. आजही या योजनेवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली.

आंदोलक ताब्यात

काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते दुपारी स्वराज्य भवन येथून निदर्शने करीत मध्यवर्ती बस स्थानकाजवळ धाव घेतली. या परिसरात फिरून आंदोलकांनी निदर्शने केली. त्यानंतर रस्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक संथ झाली होती. सिटी कोतवाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. काही वेळाने सुटका करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...