आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याची घंटा:बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात कपाशीवर दहिया, प्रसार वाढल्यास 8 दिवसात होते संपूर्ण पानगळ

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर दहिया या वेगात पसरणाऱ्या रोगाचा प्रादूर्भाव आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. दहियामुळे कपाशीच्या शिवारातील संपूर्ण पानगळ होऊन बोंडेही न फुटताच गळून पडतात. त्यामुळे वेळीच उपाययोजन न केल्यास हा रोग कापूस उत्पादकांपुढे नवे संकट उभे करू शकतो, असा इशारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमूने दिला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. जायभाये, डॉ. तारू यांनी बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा तालुक्यात तर वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा तालुक्यात डॉ. सदावर्ते, डॉ. ब्राह्मणकर, डॉ. सातपुते यांनी कपाशीच्या शिवारांची पाहणी केली. तेव्हा दहिया रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. अनेक ठिकाणी पाने सुकून गळून पडत आहेत. पाने लालसर पडत आहेत.

दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक (अझोझायस्ट्रॉबीन 18.2 टक्के, डब्ल्यूडब्ल्यू अधिक डायफेनोकोनाझोल 11.4 टक्के, डब्ल्यूडब्ल्यू एससी) 1 मिली किंवा क्रेसॉक्सिम-मिथिल 44.3 टक्के, एससी 1 मिली प्रति लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

असा ओळखा रोग

दहिया ओळखण्यासाठी पानाच्या खालच्या पांढरी पावडर दिसून येते. पानाच्या खालच्या बाजुला भूरकट पांढरे चट्टे तर वरील भागात तांबडे चट्टे पडतात. कालांतराने रोगाचे प्रमाण वाढले की पूर्ण पान वरुन खालून भुरकट पांढरे होते. पानाच्या कडा आतील बाजुने वळतात, पान सुकते व झाडाला राहते. पुढील एक दोन दिवसात पान देठापासून खाली गळून पडते.

वेळीच नियंत्रण गरजेचे

दहिया रोगाचा प्रसार सर्वदूर पसरला तर आठ दिवसात कपाशीचे सर्व पाने गळून पडतात. एकदा पाने गळून पडल्यानंतर बोंडेही फुटत नाही. बोंडे खराब होतात. त्यामुळे या रोग जास्त पसरल्यास धोक्याची घंटी आहे. त्यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे. - डॉ. धनराज उंदिरवाडे, कीटकशास्त्र विभागप्रमुख, कृषी विद्यापीठ, अकोला

पोषक वातावरण

रोगाची बीजे मातीत पडलेल्या रोगट अवशेषात सुप्तावस्थेत राहतात. पुढील वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्यांत पोषक हवामानात पुन्हा सक्रिय होऊन कपाशीवर रोगाची लागण होते. सध्या या रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बातम्या आणखी आहेत...