आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनंदिन बाजार वसुलीचे काम मनपा कर्मचांऱ्याकडे:वसुलीसाठी चौथ्यांदा निविदा बोलावणार; 3 वेळा बोलावलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीसाठी तिसऱ्यांदा बोलावलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एक निविदा प्राप्त झाली. त्या निविदा धारकाकडे अनुभव नसल्याने महापालिका प्रशासनाने चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. तुर्तास दैनंदिन बाजार वसुलीचे काम महापालिकेचे कर्मचारी करीत आहेत.

महापालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टी, विकास शुल्का नंतर परवाना तसेच दैनंदिन बाजार वसुली उत्पन्नाचे महत्वाचे साधन आहे. महापालिका क्षेत्रात महसुल विभागाच्या जागेत कच्च्या स्वरुपात बांधलेली दुकाने तसेच मुख्य मार्गालगत चारचाकी गाडी लावून अथवा खाली बसुन व्यवसाय करणाऱ्यांकडुन दैनंदिन बाजार वसुली केली जाते. दैनंदिन वसुलीचे काम पूर्वी महापालिकेचे कर्मचारी करीत होते.

मात्र बाजार विभागातील कर्मचारी सेवा निवृत्त होत गेल्याने त्यांची संख्या कमी झाली. तसेच महापालिकेची हद्दवाढ झाली. परिणामी महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीचे काम कंत्राटदारा मार्फत सुरु केले. विद्यमान कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी महापालिकेने दैनंदिन बाजार वसुलीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षीचा एका वर्षाचा ठेका 94 लाख रुपयांना देण्यात आला होता. यात 15 टक्के वाढ करुन एक कोटी सात लाख रुपये उत्पन्न प्रशासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे बाजार विभागाने दुसऱ्यांना निविदा बोलावल्या. यात केवळ एक निविदा दाखल झाली. त्यामुळे बाजार वसुलीचे काम देताना स्पर्धा झाली नाही. स्पर्धा न झाल्यास तीन वेळा निविदा प्रसिद्ध कराव्या लागतात. परिणामी तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसऱ्यांदा बोलावलेल्या निविदेत एक निविदा दाखल झाली. निविदेत अपेक्षित रक्कमही होती. मात्र निविदा धारकाकडे अनुभव प्रमाणपत्र नसल्याने प्रशासनाने आता चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला असून 20 डिसेंबर पर्यंत या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

यापूर्वी प्रशासनाने तत्कालीन कंत्राटदारास मुदतवाढ दिली. मात्र चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करावी लागणार असल्याने प्रशासनाने तत्कालीन कंत्राटदारास मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे दैनंदिन बाजार वसुलीचे काम महापालिका करीत असून यासाठी सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सहा कर्मचारी अपुरे पडत असल्याने दैनंदिन बाजार वसुलीच्या उत्पन्नात घट झाली आहे

बातम्या आणखी आहेत...