आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:वृक्ष संवर्धनाची अनामत रक्कम मनपाकडे पडून; नागरिक अनभिज्ञ

श्रीकांत जोगळेकर | अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक घराच्या बांधकामासोबतच वृक्षांची संख्या वाढावी, त्याचे संगोपन व्हावे, या महत्त्वाच्या हेतूने घराच्या बांधकामाचा नकाशा मंजूर करताना वृक्ष संवर्धन अनामत रक्कम मनपा घेत असते. एक हजार ते ३० हजारांपर्यंतच्या विकास शुल्कावर ५०० रुपये अनामत रक्कम घेतली जाते. तीन वर्ष वृक्षाचे संगोपन केल्यानंतर ही रक्कम संबंधित नागरिकांना परत मिळते. मात्र आतापर्यंत एकाही नागरिकाने ही रक्कम परत घेतलेली नाही. विशेष म्हणजे या बाबत माहिती असूनही नागरिक अनभिज्ञ आहेत.

नगर रचना अधिनियमानुसार घराच्या बांधकामाचा नकाशा मंजूर करताना विकास शुल्कासोबतच वृक्ष संवर्धनाची अनामत रक्कम घेतली जाते. नगर रचना अधिनियमानुसार अशी रक्कम घेणे अनिवार्य नाही. मात्र शहरात घरांच्या बांधकामासोबतच वृक्षांची संख्या वाढावी, वृक्षांचे संगोपन व्हावे, या हेतूने नगरपालिका अस्तित्वात असतानापासूनच वृक्ष संवर्धन अनामत रक्कम घेतली जाते. एक हजार ते तीस हजार पर्यंतच्या विकास शुल्कावर पाचशे रुपये घेतात. तर ३१ हजार ते ६० हजार रुपयांच्या विकास शुल्कावर एक हजार रुपये अनामत रक्कम घेतली जाते. विकास शुल्काची रक्कम ६० हजाराच्या वर असल्यास १५०० रुपये अनामत रक्कम घेतली जाते.

संबंधित नागरिकाने घर बांधल्या नंतर पाच झाडे लावावीत, त्याचे तीन वर्ष संगोपन करायचे आणि तीन वर्षा नंतर याबाबतची माहिती नगररचना विभागाकडे द्यायची. नगर रचना विभागाने तपासणी केल्या नंतर ही अनामत रक्कम संबंधित नागरिकाला परत दिली जाते. मात्र आता महापालिका असताना देखील एकाही नागरिकाने या रकमेची मागणी मनपाकडे केलेली नाही.

वर्षाला दोन लाख ५० हजार अनामत रक्कम
मनपाची २०१६ हद्दवाढ झाल्या नंतर वर्षाकाठी सरासरी ५०० बांधकामांना मंजुरी दिली जाते. या प्रत्येकाकडून ५०० रुपये अनामत रक्कम घेतली जाते. परिणामी वर्षाला दोन लाख ५० हजार रुपये अनामत रक्कम मनपाकडे जमा होते. मागील सहा वर्षांचा विचार केल्यास जवळपास १५ लाख रुपये नागरिकांचे मनपाकडे पडून आहेत.

पावती सांभाळून ठेवावी : घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांनी पाच झाडे लावावीत. या झाडांचे तीन वर्षे संवर्धन करावे. तीन वर्षानंतर अनामत रक्कम परत मिळण्यासाठी अर्ज करावा. झाडाचे संगोपन झाले की नाही? याची खातरजमा करून दिलेली रक्कम परत दिली जाईल. मात्र त्यासाठी अनामत रकमेची पावती सांभाळून ठेवावी, असे आवाहन सहायक नगर रचनाकार संदीप गावंडे यांनी केले.

नकाशा मंजुरीवेळी देतात माहिती
बांधकामाचा नकाशा मंजूर करताना वृक्ष संवर्धनासाठी घेतलेल्या अनामत रकमेची पावती दिली जाते. ही पावती सांभाळून ठेवावी लागते. तीन वर्षा नंतर पाच झाडांचे संवर्धन केल्याची माहिती द्यावी लागते. नकाशा मंजूर करताना या सर्व बाबी संबंधित नागरिकाला माहिती असतात.

कर मिळतो तरीही वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष
मनपा नागरिकांकडून मालमत्ता करात एक टक्का रक्कम वृक्ष कराच्या माध्यमातून वसूल करते. कराच्या वसुलीवर हा आकडा समोर येतो. तरीही सरासरी एक ते दीड कोटी रुपये वृक्ष कराच्या माध्यमातून मनपाला मिळतात. एकीकडे वृक्षकर आणि दुसरीकडे वृक्ष संगोपन अनामत रक्कम मिळत असताना मनपाकडून वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष केले जाते.

बातम्या आणखी आहेत...