आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता भाजी बाजार उद्या बंद:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन; जागा कायम स्वरूपी देण्याची संघटनेची मागणी

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनता भाजी बाजाराची जागा कायम स्वरुपी विद्यमान व्यावसायीकांना भाडेपट्ट्याने देण्यात यावी, या मागणीसाठी उद्या 7 ऑक्टोबरला जनता भाजी बाजार बंद ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न महात्मा फुले जनता बाजार संघर्ष समिती करणार आहे.

शहरातील टॉवर चौकातील जुने बसस्थानक आणि जनता भाजी बाजाराची जागा महापालिकेने महसुल विभागाकडून ताब्यात घेतली. यासाठी रितसर 26 कोटी रुपयाचा भरणा महसुल विभागाकडे केला. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी या ठिकाणी भाजी बाजारासह व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. या हेतुने महापालिकेने येथील व्यावसायीकांना नोटीस बजावल्या होत्या. या प्रकरणात जनता भाजी बाजार संघर्ष समितीने तत्कालीन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे दाद मागीतली. या प्रकरणात तत्कालीन महसुलमंत्र्यांनी जागेवर स्थगिती दिली. दरम्यान राज्यात सत्ताबदल झाला.

या जागेवरील स्थगिती उठवण्याची मागणी माजी महापौरांसह भाजपच्या आमदारांनी केली. या प्रकरणात विद्यमान महसुलमंत्री विखे पाटील यांच्या दालनात सुनावणी झाली. तुर्तास जागेवरील स्थगिती उठवली नसली तरी स्थगिती उठवण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने संघर्ष समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या रेकॉर्ड नुसार 768 व्यावसायीक येथे कार्यरत आहेत. त्याच बरोबर अन्य 350 असे एकूण 1 हजार व्यावसायीक व्यवसाय करतात.

मात्र, आमच्याशी चर्चा न करता, कोणतीही माहिती न देता, महापालिकेने ही जागा ताब्यात घेतली. त्यामुळे एक हजार कुटुंबाचा चरितार्थ कसा चालेल? हे व्यवसायीक रस्त्यावर येतील. त्यामुळेच ही जागा आम्हाला कायमस्वरुपी भाडेपट्ट्यावर द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी 7 ऑक्टोबरला जनता भाजी बाजारातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 7 ऑक्टोबर रोजी दौरा असल्याने त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती सज्जाद हुसैन, प्रदीप वखारीया, पंकज मनियार, विजय तिवारी, तश्वर पटेल, पंकज शिवाल, निलेश चिराणीया, जितेंद्र अग्रवाल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...