आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगपालिकेच्या ३० प्रभागांपैकी १५ प्रभागात तीनपैकी दोन जागा महिलांसाठी (एससी, एसटी, ओबीसीसह) राखीव झाल्याने प्रस्थापित मावळत्या नगरसेवकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षातील आजी-माजी नगरसेवकांचा आमना-सामना होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक इच्छुक मावळते नगरसेवक आई अथवा पत्नीला उमेदवारी मिळवून देण्याच्या कामाला लागले आहेत.
महानगरपालिकेच्या ९१ जागांपैकी ४६ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक ३, ४, ६,८, ९,१२, १३, १६, १७, १८, १९, २२, २५, २६, २८ यामध्ये तीन पैकी दोन जागा महिलांसाठी तर एक जागा सर्व साधारण गटासाठी आहे. प्रभाग क्रमांक ३० मधून चार नगरसेवक निवडून दिले जाणार असल्याने या प्रभागात दोन जागा महिलांसाठी तर दोन जागा सर्व साधारण आहेत. या प्रभागासह अन्य प्रभागात जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने विविध राजकीय पक्षातील अनेक मावळत्या नगरसेवक तसेच इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील इच्छुकांनी जनसंपर्क सुरु केला होता तर काहींनी संपर्क कार्यालय देखील थाटले होते. त्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे.
अनेक मावळते सदस्य अडचणीत
प्रभाग क्रमांक २ मध्ये मावळते नगरसेवक रहिम पेंटर, प्रभाग क्रमांक ३ मधील मावळते नगरसेवक पराग कांबळे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राहुल देशमुख, राजेंद्र गिरी, प्रभाग क्रमांक १३ मध्ये सतीश ढगे, तुषार भिरड, प्रभाग क्रमांक १६ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव असल्याने मावळते विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण आणि महंमद इरफान यांच्या पैकी एकालाच उमेदवारी मिळेल. प्रभाग क्रमांक २१ मध्ये दोन जागा महिलांसाठी असल्याने विनोद मापारी, विजय इंगळे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. प्रभाग क्रमांक २५ मध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्याने शिवसेनेचे विद्यमान गटनेते राजेश मिश्रा यांची सर्वाधिक कोंडी झाली आहे. त्यामुळेच ज्याला सर्व साधारण मधून उमेदवारी मिळणार नाही. त्यांना एकतर आई अथवा पत्नीला उमेदवारी मिळवून द्यावी लागणार असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे.
राजकीय चित्र अस्पष्ट
प्रभाग आरक्षणाने अनेकांची कोंडी झाली. दिग्गजांचा आमना-सामना होण्याची शक्यता असली तरी पक्षाची आघाडी, युती अद्याप झालेली नाही. कोणते प्रभाग कोणाला सुटतात, ते कोण उमेदवार देतात? उमेदवारी न मिळालेले बंडखोरी करतात का? तसेच मुख्यमंत्री शिंदे गट किती जागा लढवणार? याचा फटका शिवसेनेला बसणार का? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. त्यामुळे निवडणुकीच्या वेळीच हे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
या प्रभागात होऊ शकतो दिग्गजांचा सामना
प्रभाग क्र. ८ मध्ये सागर शेगोकार, बबलू जगताप, नीलेश देव, प्रभाग क्र. १४ मध्ये महंमद मुस्तफा, अफसर कुरेशी, प्रभाग क्र.२२ मध्ये बाळ टाले, गोपी ठाकरे, पंकज साबळे, पंकज जायले. प्रभाग क्रमांक २४ मध्ये हरीश आलिमचंदानी, मदन भरगड, योगेश साहू, सागर भारुका. प्रभाग क्रमांक २६ मध्ये गजानन चव्हाण, दिलीप देशमुख, अमोल गोगे,प्रभाग क्रमांक २७ मध्ये सपना नवले, जयश्री दुबे, प्रभाग क्रमांक २८ मध्ये संजय बडोणे, रफीक सिद्दीकी, फय्याज भाई, प्रभाग क्रमांक २९ मध्ये आनंद बलोदे, पंकज गावंडे आदी आजी, माजी नगरसेवकांमध्ये आमना-सामना होण्याची शक्यता असल्याने या प्रभागातील लढती चुरशीच्या ठरणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.