आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतर्कतेचा इशारा दिला:काटेपूर्णातून 19 तासांत 2.90 दलघमीचा विसर्ग ; 11 सप्टेंबर पासुन विसर्ग सुरूच

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे रविवारी ११ सप्टेंबरला रात्री ११ वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. साेमवारी १२ सप्टेंबरला पाण्याचा फ्लो कमी झाल्याने सकाळी ११ वाजता विसर्ग कमी करण्यात आला. दरम्यान सायंकाळी सात वाजेपर्यंत १९ तासात २.९० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला. वृत्त लिहीपर्यंत विसर्ग सुरुच होता. दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा प्रकल्पा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दशलक्ष घनमीटर आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस झाल्याने ३१ जुलैला प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. ऑगस्ट महिन्यातही प्रकल्पाचे दरवाजे वारंवार उघडावे लागले. तर सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने १ सप्टेंबर पासून वारंवार प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. ११ सप्टेंबरला रात्री ११ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ३० सेंटी मीटरने उघडण्यात आले. यातून ५०.१६ घनमीटर प्रतिसेकंद (५० हजार १६० लिटर प्रतिसेकंद) सुरु करण्यात आला. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रभर प्रकल्पाच्या दोन दरवाज्यातून विसर्ग सुरु होता. साेमवारी १२ सप्टेंबरला प्रकल्पात पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाल्याने दरवाजे ३० सेंटी मीटरवरुन १५ सेंटीमीटर करण्यात आले. तसेच विसर्ग कमी करुन २५.६४ घनमीटर प्रतिसेकंद (२५ हजार ६४० लिटर प्रतिसेकंद) करण्यात आला आहे. आता पर्यंत १९ तासात २.९० दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. दरम्यान प्रकल्पातील पाण्याची आवक पाहून प्रकल्पाचे दरवाजे अधिक प्रमाणात उघडायचे तसेच बंद करायचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या महिन्यात तीन वेळा उघडले दरवाजे ः १ सप्टेंबर पासून आतापर्यंत काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे वारंवार उघडावे लागले आहेत. १ सप्टेंबरला उघडलेले दरवाजे २ सप्टेंबरला बंद करण्यात आले. त्या नंतर ४ सप्टेंबरला पुन्हा दरवाजे उघडले ते ५ सप्टेंबरला बंद करण्यात आले. तर ८ सप्टेंबरला उघडलेले दरवाजे ९ सप्टेंबरला बंद करण्यात आला. आता ११ सप्टेंबरला प्रकल्पाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. मोर्णा-उमा प्रकल्पातून विसर्ग ः काटेपूर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरु असताना जिल्ह्यातील मोर्णा आणि उमा या दोन मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरु आहे. मोर्णा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन १८ सेंटीमीटरने विसर्ग सुरु असून, २८.२४ घनमीटर प्रतिसेकंद (२८ हजार२४० लिटर प्रतिसेंकद) तर उमा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन ३ सेंटीमीटरने पाणी वाहात असून, २.५२ घनमीटर प्रतिसेकंद (२ हजार ५२० लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...