आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड पारवा प्रकल्पातील विसर्ग बंद:89 तासांत 72 कोटी 73 लाख लिटर पाण्याचा विसर्ग; चांगला पाऊस झाल्यास पुन्हा उघडणार दरवाजे

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विद्रुपा नदीवरील दगड पारवा प्रकल्पातून सुरू असलेला विसर्ग शुक्रवारी (29 जुलै) सकाळी 8 वाजता बंद करण्यात आला. मागील 89 तासात 72 कोटी 73 लाख 8 हजार लिटर पाण्याचा विसर्ग विद्रुपा नदीत करण्यात आला. तुर्तास पावसाने विश्रांती घेतली असली तरी जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

पावसाची आवक मंदावली

दगड पारवा प्रकल्पात 80 टक्क्यापेक्षा जास्त जलसाठा उपलब्ध झाल्याने दगड पारवा प्रकल्पाचा एक दरवाजा 25 जुलै रोजी दुपारी तीन वाजता 2.50 सेंटीमीटरने उघडण्यात आला होता. यातून 2.27 घनमिटर प्रतिसेकंद (दोन हजार 270लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम राहिल्याने विसर्ग सुरूच ठेवण्यात आला. मात्र 29 जुलै रोजी पावसाचा जोर कमी झाल्याने तसेच प्रकल्पातील पाण्याची आवक मंदावल्याने सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे दार बंद करण्यात आले. पावसाचा जोर आणि प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून दरवाजा अधिक प्रमाणात उघडणे अथवा बंद करणे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली.

सुटकेचा श्वास सोडला

दरम्यान विद्रुपा नदीचे पाणी मोर्णा नदीला येऊन मिळते. त्यामुळे मोर्णा नदी दुथडी भरुन वाहात होती. तसेच विद्रुपा नदी काठी शहरातील खडकी या भागात मोठ्या प्रमाणात वस्ती झाली आहे. दगड पारवा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने या वस्त्यांमध्ये पुराबाबत भिती व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता प्रकल्पाचा दरवाजा बंद करण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

बातम्या आणखी आहेत...