आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे आणि काँग्रेस कार्यकर्ते भ्रष्ट परिवाराच्या बचावासाठी आंदोलन करत आहेत, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केला आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांनी प्रत्युत्तर दिले. हा आरोप हास्यास्पद व धादांत खोटा आहे. विजय अग्रवाल यांनी आमचा भ्रष्टाचार सांगावा, पारदर्शकता आम्ही सांगू, त्यासाठी अकोल्यातल्या कोणत्याही चौकात चर्चा करायला तयार आहोत, असे ते म्हणाले. आज येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ईडीच्या कारवाईला घाबरणार नाही
कपिल ढोके म्हणाले की, ज्याचा व्यवहारच झाला नाही, कोणालाही लाभांश मिळालेला नाही. त्याची चौकशी कसली केली जाते व कोणत्या न्यायालयाचे दाखले देता, असा सवाल उपस्थित करत गांधी कुटुंबाला ईडीची पाठवलेली नोटीस ही केवळ राजकीय सुडबुद्धीने पाठवलेली आहे, असे ते म्हणाले. आम्ही आमच्या नेत्याच्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरत आहोत. आरएसएस आणि भाजपला गांधी नावाची भीती वाटते. ईडीच्या कारवाईला राहूल गांधी घाबरणार नाहीत. त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास तुरुंग कमी पडतील, असे ते म्हणाले.
संपत्तीत वाढ कशी झाली?
काँग्रेस कार्यकर्तांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे, असे ढोके म्हणाले. तर आमदार सावरकर व विजय अग्रवाल यांच्या संपत्तीत वाढ झाली त्यांनी सांगावे. लोकसेवेत असताना त्यांच्या संपत्तीत वाढ कशी झाली हे आम्ही अकोल्याच्या चौकात सांगू, असे यावेळी प्रशांत गावंडे म्हणाले. तर पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रशांत गावंडे, विजय देशमुख, डी.ए. पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.