आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फवारणीच्या कामास प्रारंभ:महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून डास निर्मूलनासाठी जंतूनाशक फवारणी

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात डास निर्मूलनासाठी मनपा मलेरिया विभागाने जंतूनाशक फवारणी,धुरळणीचे काम सुरु केले आहे. त्यासाठी चार ई-व्हेईकल फवारणी वाहने तर ८ धुरळणी यंत्राचा वापर केला जात आहे. शासनाने २०२५ पर्यंत राज्य हिवताम मुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. या अनुषंगानेच मनपाच्या चारही झोनमध्ये डास निर्मूलनासाठी मलेरिया विभागाकडून फवारणीचे काम सुरू आहे. हिवताप मुक्त अकोला करण्यासाठी यावर्षी एकच दिवस जनजागृती करून न थांबता वर्ष हिवताप जनजागृती वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षी मनपा कार्यक्षेत्रात हिवतापाचा कुठेही उद्रेक किंवा हिवतापामुळे एकही मृत्यु झालेला नाही. यावर्षी एक रुग्ण डेंग्यु या आजराने दगावला असून, मलेरिया विभागा अंतर्गत शहरात स्प्रे मशीनद्वारे डासअळी नाशक फवारणी करण्यात येत असून, रुग्ण निघालेल्या परिसरात धुरळणी करण्यात येत आहे, अशी माहिती मनपा जीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी दिली.

अशा करा उपाय योजना ः हिवतापाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साचलेले पाणी वाहते करावे, पाणी साचलेले खड्डे बुजवावेत, पाण्याच्या भांड्यांना घट्ट झाकण बसवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, घरांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, साचलेल्या पाण्यात किंवा डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडावेत, निरुपयोगी साहित्य जसे ड्रम, नारळाची करवंटी, टायर, रिकामे डबे नष्ट करावे, कुलरमधील पाणी दर दोन दिवसांनी बदलावे, संडासाच्या व्हॅट पाइपला जाळी बसवावी, कुंड्यांमध्ये आवश्यक तेवढेच पाणी टाकावे, घरांच्या खिडक्यांना जाळी बसवावी, झोपताना मच्छरदाणीचा वापर आदी उपाय योजना करुन नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या झाली कमी : पूर्वी शहरात फवारणी, धुरळणी करण्याच्या कामासाठी २४ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी पाच कर्मचारी सुपरवायझर झाले आहेत. त्यामुळे फवारणी धुरळणी करण्यासाठी १९ कर्मचारीच नियुक्त आहेत.

बातम्या आणखी आहेत...