आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या हातरुण सर्कलच्या निवडणुकीत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. ‘वंचित’च्या उमेदवार लीना शेगोकार यांनी शिवसेनेच्या अश्विनी गवई यांचा १ हजार ६४१ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसचाही सफाया झाला. यानिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रयोग फसल्याचे दिसून आले. आता जुलै महिन्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक होणार असून, पोटनिवडणुकीतील विजयामुळे सत्ता कायम ठेवण्याचा ‘वंचित’चा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. सोमवारी निकाल जाहीर होताच ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
हातरूण सर्कलमधून शिवसेनेच्या सुनीता सुरेश गोरे विजयी झाल्या होत्या. मात्र नामनिर्देशनपत्र सादर करताना गोरे यांनी शेत जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञालेखात केला नाही, असा आरोप विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला होता. आयुक्तांनी गाेरे यांना अपात्र घोषित केले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. रविवारी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी बाळापूर येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.
शिवसेनेसह आ. देशमुख यांना धक्का : सन २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघात शिवसेनेचे नितीन देशमुख विजयी झाले होते. त्यांनी गत दहा वर्षांपासून ‘वंचित’च्या ताब्यात असलेला मतदारसंघ काबीज केला होता. तेव्हापासूनच या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत ‘वंचित’ विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतो. पोट निवडणुकही आ. देशमुखसह शिवसेना आणि ‘वंचित’ने प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही बाजूने प्रचंड फिल्डिंग लावण्यात आली. मात्र ‘वंचित’चा झालेला दणदणीत विजय आणि शिवसेनेचा दारूण पराभव हा देशमुख यांच्यासह शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या नवीन कार्यकारिणीत दाेन जिल्हाप्रमुख झाले. त्यातील एक जिल्हाप्रमुख म्हणून बाळापूर व मूर्तिजापूर मतदारसंघाची जबाबदारी आ. देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव हा पक्षासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.
ही आहेत जय-पराजयाची कारणे...
१) हातरुण सर्कलमध्ये अल्पसंख्याक मते ही निर्णायक आहेत. याच पृष्ठभूमीवर शिवसेनेने अश्विनी अजाबराव गवई (शिफानाज सैय्यद अमीर) यांना उमेदवारी दिली. अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती आणि आपली पारंपरिक मते मिळतील असे शिवसेनेने गृहित धरून फिल्डिंग लावली. मात्र ‘वंचित’नेही आपल्या पारंपरिक मतांचे (अनुसूचित जाती/मागासवर्गीय) विभाजन होणार नाही आणि अल्पसंख्यांक व काही आेबीसी मते कशी मिळतील, याअनुषंगाने प्रयत्न केले. यात ‘वंचित’ला यश आले.
२) काँग्रेसची सुमार कामगिरी शिवसेनेच्या मुळावर उठली.
३) ‘वंचित’ने सांघिकपणे काम करत कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत फायदा
जुलै महिन्यात अध्यक्ष-उपाध्यक्ष व सभापतींची दुसऱ्या टर्मची निवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीपूर्वीची सदस्य ‘वंचित’ची सदस्य संख्या २४, शिवसेना-१३, भाजप-०५, काँग्रेस-४, राकाँ-४, प्रहार-१ आणि दोन अपक्ष असे पक्षीय बलाबल होते.
आता पोटनिवडणुकीनंतर ‘वंचित’ची सदस्य संख्या सर्वाधिक २५ झाली असून, शिवसेना सदस्यांची संख्या १२ झाली आहे. त्यामुळे यापूर्वी सन २०२० मध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून लांब राहिलेल्या भाजपने आगामी निवडणुकीतही हीच भूमिका कायम ठेवल्यास त्याचा फायदा ‘वंचित’ला होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.