आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण:गणेश विसर्जनासाठी केले 135 निसर्गपुरक कुंड्यांचे वितरण

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ज्या नागरिकांच्या घरी दीड दिवसाचे गणपती आहेत. त्या नागरिकांना गणपतीचे विसर्जन आपल्या घरीच करता यावे, यासाठी नीलेश देव मित्र मंडळाच्या वतीने कुंडी तसेच तुळशीचे रोप देण्यात आले. १ सप्टेंबरला दुपारपर्यंत १३५ नागरिकांना या कुंड्याचे तसेच तुळशीच्या रोपाचे वितरण करण्यात आले.

घरोघरी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी शाडू मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. नीलेश देव मित्र मंडळाने पर्यावरणपूरक माती अथवा शेणापासून तयार झालेल्या गणेशाची स्थापना केल्यास गणेश विसर्जनासाठी कुंडी तसेच तुळशीचे रोप देण्याचे जाहीर केले होते. पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केल्याची माहिती मात्र द्यावी लागणार होती. या योजनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ज्या नागरिकांकडे दीड दिवसाचा गणपती आहे. त्यांनी ३१ ऑगस्ट रोजीच ही माहिती मंडळाला दिली. यानुसार या कुंड्याचे वितरण करण्यात आले. न्यू तापडिया नगर, जठारपेठ, प्रसाद कॉलनी, गड्डम प्लॉट, रामदास पेठ, तापडिया नगर, जुने शहरातील पार्वती नगर, रेणुका नगर या भागात या पर्यावरणपूरक कुंड्या वितरित केल्या. गणेश भक्तांनी घरोघरी बसवलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन या कुंड्यांमध्ये केले. तसेच विसर्जना नंतर याच कुंडीत तुळशीचे रोप लावले. तसेच ज्या नागरिकांकडे तीन, पाच दिवसासाठी गणराय विराजमान अाहेत व त्यांनी पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना केली असल्यास त्या भाविकांनी मंडळांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील मंडळाने केले आहे.

विसर्जनासाठी कृत्रिम टाके, रथ
दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले असले, तरी ९ सप्टेंबरला गणपती विसर्जनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातव चौकात कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था केली जाते. तसेच मंडळाच्या वतीने ८ सप्टेंबरपासून निर्माल्य रथ उपलब्ध करण्यात येणार आहे. भाविकांनी निर्माल्य नदीत अथवा अन्य ठिकाणी न टाकता या रथातच टाकावे. तसेच कृत्रिम गणेश विसर्जन कुंड व निर्माल्य रथाचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा, असे आवाहन नीलेश देव मित्र मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...