आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अकोल्यात 12 हजारांवर एसटी स्मार्टकार्डचे वितरण

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना २५ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी जोडलेले स्मार्टकार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारांमध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची मुभा सुरूवातीला देण्यात आली होती, आता ती वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. दरम्यान, अकोला आगार क्रमांक दोन मधून १२ हजारांवर स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले आहे.एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी आता प्रवाशांना ३१ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. अकोला विभागात स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे.

स्मार्ट कार्ड कार्यप्रणालीमधील काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. यामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी सध्या मंदावली आहे. यामुळे केवळ स्मार्ट कार्ड नूतनीकरण आणि स्मार्टकार्ड टॉपअप प्रक्रिया सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसह सवलतधारकांसाठी असलेल्या स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी मार्च, २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असे पत्र एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले.

यापूर्वीही अनेकदा मुदतवाढ
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्डसाठी नोंदणी करणे किंवा स्मार्ट कार्ड घेणे शक्य झाले नाही. जुलैमध्ये आषाढी एकादशी निमित्ताने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या मागणीनुसार या योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...