आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट देणार, लवकरच राबवणार निविदा प्रक्रिया

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम कंत्राटी पद्धतीने केले जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून येत्या काही दिवसात ठेकेदाराकडून हे काम करवून घेतले जाणार आहे. दिव्य मराठीने 6 सप्टेंबर रोजी शहरातील मोकाट जनावरांबाबत वृत्त प्रकाशित करुन या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

शहरात मोकाट श्वानांसोबत जनावरांचाही सुळसुळाट वाढला आहे. बकरी, गाय, वासरु, गोऱ्ह तसेच वळु यांचा सुळसुळाट वाढला आहे. विशेष म्हणजे बकरी, गाय, वासरु, गोऱ्हे पकडुन कोंडवाड्यात टाकल्या नंतर या जनावरांचे मालक दंडाची रक्कम भरुन आपापली जनावरे घेऊन जातात. मात्र एकतर कोंडवाडा विभागाकडून वळु कोंडवाड्यात टाकला जात नाही. तसेच एखादवेळी वळुला कोंडवाड्यात टाकले तर त्याला सोडविण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनासाठी वळु डोकेदुखी ठरला आहे.

केवळ चार कर्मचारी

अनेक भागात या वळुमुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्या नंतर कोंडवाडा विभागाचे कर्मचारी वळुला पकडण्यासाठी येतात. परंतु या चार कर्मचाऱ्यांची ताकद भल्या मोठ्या वळु समोर कमी पडते. त्यामुळे हे कर्मचारी वळु पकडण्याचा नाद सोडतात. त्यामुळे वळुंवर नियत्रंण राहिलेले नाही. पुर्वी जनावरे पकडण्यासाठी 11 कर्मचारी होते. आता केवळ चार कर्मचारी राहिले आहेत. हीच सर्वात मोठी अडचण ठरली आहे. या अनुषंगानेच दिव्य मराठीने या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

गाढवांचा रहदारीत अडथळा

वळुंमुळे नागरिक जखमी होत आहेत. याच बरोबर गाढवामुळे रहदारीत अडथळा होतो. अनेकदा गाढवांना कोंडवाड्यात बंद केल्या नंतर गाढवाचे मालक त्यांना सोडविण्यासाठी येत नव्हते. तसेच हर्रासीच्या वेळी केवळ गाढवाचे मालकच उपस्थित राहायचे. त्यामुळे गाढवांना पकडून त्यांना केवळ चारा देण्याचे काम महापालिकेला करावे लागल्याने महापालिकेने गाढवांना कोंडवाड्यात टाकणे बंद केले आहे. त्यामुळे गाढवांचा रहदारीतील अडथळा मात्र कायम आहे.

वळुंना कोणी घेत नाही

कोंडवाडा प्रभारी विभाग प्रमुख अनिल बिडवे म्हणाले, मोकाट वळुंना कोंडवाड्यात बंद केले तर सात दिवसानंतर हर्रासीत कोणी येत नाही. तसेच हर्रासीला कोणी आले नाही तर गाय, वासरु गोरक्षणला दिले जातात. मात्र वळुंना कोणीच घेत नाही. तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वळुंना पकडण्यात अडचणी येत आहेत. परंतु आता मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट दिले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर संबंधित कंत्राटदाराला मोकाट जनावरे पकडण्याचे काम देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...