आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या उत्पन्नात वाढ:दोन वर्षानंतर एसटी महामंडळाची दिवाळी साजरी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाला दिवाळीच्या दिवसांमध्ये चांगले उत्पन्न प्राप्त झाले आहे. १२ दिवसांमध्ये एकूण जिल्ह्यातील पाच आगारातून मंडळाला २ कोटीवर उत्पन्न मिळाले आहे. गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच दिवाळीमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी वाढल्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे काेरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाच्या अकोला विभागात ९ आगार आहेत. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या अकोला विभागातून काही ठिकाणी अतिरिक्त बस सोडण्यात आल्या होत्या.१९ ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान अकोला विभागातून राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या. लांबच्या मार्गावर दिवाळीपूर्व आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले.

याशिवाय स्थानिक फेऱ्यांमध्येही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद होता. दिवाळीच्या दिवसांमध्ये बसस्थानकावर मोठी गर्दी बघावयास मिळाली.अकोला विभागात दिवाळी दरम्यान सर्वाधिक उत्पन्न अकोट आगाराने प्राप्त केले. अकोला आगार क्र. १ उत्पन्न ४१ लाख ५२ हजार, अकोला आगार क्र. २ चे उत्पन्न ५३ लाख ५८ हजार, अकोट आगार ५७ लाख ७६ हजार, तेल्हारा आगार ३१ लाख २२, मूर्तिजापूर २७ लाख ३६ हजारांवर राहिले. दोन वर्षे काेराेनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी सेवा ठप्प होती. यामुळे मोठ्या काळानंतर दिवाळीचे उत्पन्न एसटी मंडळास प्राप्त झाले आहे. परिणामी विभागासाठी दिवाळी आनंदाची ठरली आहे.

प्रवाशांची पुन्हा एसटीला पसंती
एसटीच्या अकोला विभागातून दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी पुन्हा एसटीला पसंती दर्शवली आहे. अकोला विभागातील सर्व आगारांमध्ये योग्य नियोजन केल्याने आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांना चांगली सेवा देता आली आहे. शुभांगी शिरसाट, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, अकोला.

उत्सव काळातील दरवाढ मागे : एसटी महामंडळाच्या वतीने उत्सव काळासाठी नियमित प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली होती. १९ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ही दरवाढ आकारण्यात आली. मात्र १ नोव्हेंबरपासून लागू केलेली दरवाढ मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा प्रवाशांना पूर्वीच्या दराने प्रवास करता येणार आहे. निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...