आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:अपयशाने खचू नका; आणखी प्रयत्न करा

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड काळानंतर झालेल्या बारावीच्या ऑफलाइन परीक्षांमुळे यंदाच्या निकालाला महत्त्व आहे. कोविड काळात अध्यापन प्रकियेवर मर्यादा आल्या असल्या तरी शिक्षण विभागाने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या सोयीचे निर्णय घेत सवलती दिल्या. या संधीचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तर अनेकांना गुण कमी मिळाले. काहींना अपयश आले. मात्र अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढच्या परीक्षेची तयारी करा, असे आवाहन शिक्षण तज्ज्ञांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अर्थात एचएससी बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी, ८ जूनरोजी जाहीर झाला. त्यामध्ये जिल्ह्याचा निकाल ९५.८४ टक्के लागला आहे. त्या अनुषंगाने तज्ज्ञांनी वरील मत व्यक्त केले.

३.३८ टक्क्यांनी निकाल घसरला : गेल्यावर्षीच्या तुलनेत ३.३८ टक्क्यांनी निकाल घसरला असला तरी यंदा परिस्थिती वेगळी आहे. गेल्या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल बारावीच्या अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे तसेच दहावी व अकरावीतील गुणांच्या आधारावर तयार करण्यात आला होता. गेल्या वर्षी जिल्ह्यातून २२ हजार ८७२ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. केवळ १९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. जिल्ह्याचा निकाल ९९.९२ टक्के लागला होता.

या निकालातून आत्मविश्वास घ्यावा
कोविड काळानंतरचा पहिल्या ऑफलाईन परीक्षेचा निकाल या दृष्टीने या निकालाला महत्त्व आहे. तसे प्रवेश परीक्षांमुळे बारावीच्या गुणांना फारसे महत्त्व राहिलेले नसले तरी अजून बऱ्याच ठिकाणी प्रवेशासाठी बारावीचे गुण पाहिले जातात. कोविड काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले, ते भरून न निघणारे आहे. या पार्श्वभूमीवर लागलेला जिल्ह्याचा ९५ टक्के निकाल प्रश्नचिन्ह निर्माण करीत असला तरी सकारात्मकतेने याकडे पाहिले पाहिजे. दुसऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या करिअरचा एक टप्पा पूर्ण झाल्याने ्यांची जबाबदारी अजून वाढलेली आहे. या निकालाने आत्मविश्वास दिला तरी पुरेसे होईल.डॉ. गजानन नारे, शिक्षणतज्ज्ञ

करिअरचे विविध मार्ग मोकळे
ऑनलाईन वर्ग व कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध शैक्षणिक अडचणींनंतर समोर येणारा हा निकाल निश्चितच उत्साहवर्धक आहे. कोविड काळात विद्यार्थी व शिक्षकांमधील संवादावर मर्यादा आल्या होत्या. अनेकांचा लिखाणाचा सराव खंडित झाला होता. अशा परिस्थितीत यंदाचा निकाल विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य दर्शविते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करियरचे मार्ग विद्यार्थ्यांसाठी मोकळे होतात. त्याचा चौकस राहून विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा व आवड, कौशल्ये ओळखून अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील संधीची तयारी करावी. डॉ. प्रसन्नजीत गवई, शिक्षणतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...