आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जगण्याचे भान लेखणीतून सुटायला नको : विठ्ठल वाघ

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कविता लोकजागरणाचे सशक्त माध्यम आहे. संस्कृतीचे सार आहे. कवितेमध्ये केवळ शब्दांचा नाही तर प्रतिक-प्रतिमांचा वापर व्हावा कारण प्रतिकं शब्दांपेक्षा अधिक बोलकी असतात; आपल्या जगण्याचा भाग असतात. आपलं जगणं आपल्या लेखनातून सुटायला नको, हे भान कवीने सातत्याने जपायला हवं असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी केले.

केंद्रिय संस्कृती मंत्रालय, साहित्य अकादमी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात किड्स स्कूल येथे शनिवारी ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यचिकित्सक तथा लेखक डॉ. नानासाहेब चौधरी होते तर व्यासपीठावर साहित्य अकादमीचे डॉ. प्रमोद मुनघाटे, विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोल्याचे अध्यक्ष विजय कौसल, कार्याध्यक्ष सीमा शेटे-रोठे व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. गजानन नारे प्रामुख्याने उपस्थित होते. संस्कृती लोकजीवनातून समृद्ध होत असते; त्यातील प्रतिमा आणि प्रतिकांचा वापर कवितेतून झाला पाहिजे. वऱ्हाडी बोली समृद्ध असून या भाषेची परंपरा पुढे चालत राहिली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. वाघ यांनी व्यक्त केली. या वेळी डॉ. विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या वऱ्हाडी कविता खास शैलीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. प्रतिकांच्या वापरातून कवितेला सौंदर्य येतं पण त्याला वास्तवाचा अर्थ देण्यासाठी आपल्या कवितेतून आपलं जगणं व्यक्त होण्याची गरज व्यक्त केली.

फुललेल्या कापसाले चंद्र चोरु चोरु पाहे तरी माय माऊलीची मांडी उघडीच राहे वऱ्हाडी शब्द संस्कृतीचे जतन करण्यासाठी डॉ. विठ्ठल वाघ यांनी संत गाडगेबाबा यांच्या जन्मस्थानापासून ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाईच्या गावापर्यंत काढलेल्या काव्ययात्रेदरम्यानचा अनुभवही त्यांनी सांगितले. नरनाळा, असदगड, पूर्णा यासह येथील संपूर्ण लोक जीवनाचं सार त्यांच्या कवितेत अभिव्यक्त झालं असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मनोगतानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी खास वऱ्हाडी शैलीत उत्तरे दिली. कार्यक्रमारंभी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोलाद्वारे घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले, तर आभार प्रसिद्धी प्रमुख नीलेश पाकदुणे यांनी मानले.