आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. भालेंचा कार्यकाळ संपल्याने कृषी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी अमरावतीचे कुलगुरू:प्रा.डॉ.दिलीप मालखेडेंनी स्वीकारला पदभार

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कार्यान्वित केलेल्या शेतकरी आणि विद्यार्थी हिताच्या विविध योजनांना अधिक सक्षमतेने साकारत शेतकरी केंद्रित व्यवस्थापनाचा अंगीकार करण्याचे सुतोवाच नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.

कुलगुरू प्रा. डॉ. विलास भाले यांचा कुलगुरू पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपन्न झाला. त्यानंतर राज्यपाल यांच्या निर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी सोमवारी, 5 सप्टेंबरला सकाळी अकोला येथील विद्यापीठाच्या मुख्यालयी कुलगुरू कार्यालयात झालेल्या समारंभात कुलगुरू पदाचा प्रभार डॉ. विलास भाले यांच्याकडून स्वीकारला.

याप्रसंगी उपस्थित विद्यापीठ अधिकारी वर्गाला संबोधित करताना कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी डॉ. भाले यांच्या कार्यकाळातील अनेकानेक उपलब्धींना उजाळा देत विद्यापीठाचा पुढील प्रवास हा विद्यार्थी तथा शेतकरी केंद्रित राखत शाश्वत ग्राम विकासासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या मधील समन्वय अधिक वृद्धिंगत करीत विदर्भातील गाव खेड्यांपर्यंत कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी एकात्मिक प्रयत्नांची मोट बांधण्यासाठी कटिबंद्धता व्यक्त केली.

डॉ. भाले यांनी आपल्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात केलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यापीठातील सर्वच घटकांनी तन-मन-धनाने सहयोग दिला. राज्य तथा केंद्र शासनाने दिलेल्या राजाश्रयामुळे विविध उपक्रमांची अंमलबजावणी शक्य झाली तथा लोकप्रतिनिधी, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य, प्रयोगशील - प्रगतीशील शेतकरी आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या सहकार्यातून अकोला कृषी विद्यापीठाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून देता आले याबद्दल समाधान व्यक्त करीत सर्वांचेच आभार व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. शामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील यांच्यासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रा. डॉ. संजय खडसे, प्रा. डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. राजीव बोरकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, रमेश जाधव यांच्यासह कृषी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारी, विद्यार्थी कल्याण अधिकारी, मुख्य वसतिगृह अधीक्षक यांची उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...