आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दार:खा. भावना गवळी यांनी दिलेली तक्रार खोटी; गद्दार म्हटले आणि म्हणतच राहू

अकोला4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यांना शेवटपर्यंत गद्दार म्हणणारच. एवढेच नाही तर वाशीम जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जाऊन गद्दार म्हणू, मात्र, शिवसैनिकांनी त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले असे म्हणणे भावनाताईंना शोभत नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार आमच्यावर आहेत. पोलिसांत दिलेली तक्रार खोटी आहे, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख म्हणाले. बुधवारी भावना गवळी यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी देशमुख पत्रकार परिषदेत बोलत होते.

आ. देशमुख म्हणाले, की २२ नोव्हेंबरला खासदार विनायक राऊत यांनी चिखली येथे शेतकरी मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार म्हणून आढावा बैठक घेतली होती. अकोल्याहून ते परत विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. मात्र, अर्धा तास गाडीला उशीर असल्याने ते आणि कॅप्टन सुर्वे हे रेल्वेस्थानकावर खुर्ची टाकून बसले होते. तेवढ्यात भावना गवळीही मुंबईला जाण्यासाठी तेथे आल्या आणि राऊत व सुर्वे या दोघांना पाहून त्या गोंधळून गेल्या. त्यांना पाहून शिवसैनिकांनी गद्दारचे नारे लावले. तेथील प्रवाशांनीही गद्दारचे नारे लावले. त्यानंतर भावना गवळी यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यात त्यांनी आपल्यासोबत अश्लील चाळे केले असा आरोप केला. यवतमाळमध्ये त्यांचा आमदारासोबत झालेला वाद, कंत्राटदारांना धमकावणे हे लोकांना माहीत आहे. त्यांच्यासोबत असे वागण्याची कोणाचीही हिंमत नाही.

बाळासाहेबांच्या विचारधारेचा प्रत्येक माणूस त्यांना गद्दार म्हणेल, मग त्या प्रत्येकाचा असा खोटा रिपोर्ट देणार का, असा सवालही देशमुख यांनी केला. पत्रकार परिषदेला गोपाल दातकर, राजेश मिश्रा, ज्योत्स्ना चोरे, सुनीता मेटांगे, देवश्री ठाकरे, प्रदीप गुरूखुद्दे, दिलीप बोचे, नितीन ताकवाले, विजय परमार, गजानन चव्हाण, राहुल कराळे उपस्थित होते.

उलट मोदींच्या फोटोमुळे आमचे आमदार कमी झाले
निवडणुकीत मोदींचा फोटो लावला म्हणून शिवसेनेचे लोकं निवडून आले, असे भावना गवळी म्हणतात मात्र, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. उलट मोदींचा फोटो निवडणुकीत संयुक्तपणे लावल्याने आमचे आमदार कमी झाले. त्यांचा फोटो जेव्हा आम्हीच काय भाजपही वापरत नव्हती तेव्हा मात्र आमचे आमदार अधिक संख्येने निवडून आले होते. त्यामुळे मोदींचा आमच्यावर चांगला परिणाम कधीच झाला नाही, असेही आ. नितीन देशमुख म्हणाले.

हा तर महिला असल्याचा गैरवापर : आ. देशमुख म्हणाले, की आम्ही या तक्रारीचा आणि भावनाताईंचा निषेध करतो. त्यांनी अश्लील चाळे हा शब्द वापरून महिला असल्याचा गैरवापर केला आहे. आम्ही त्यांना गद्दार म्हटलेच आणि म्हणत राहू, या दुमत नाही.

बातम्या आणखी आहेत...